अमरावती : उष्ण भागात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या निवडुंगाचं झाडं सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी विदर्भातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या चिखलदरा येथे इंग्रजांनी लावलं. ते लागलं आणि वाढलं देखील. विशेष म्हणजे चिखलदरा येथील ओसाड पडलेल्या निवडुंग उद्यानात दीडशे वर्ष जुनं 'निवडुंग' एखादी कलाकृतीच भासावी असा भासतो. 2017 मध्ये वनविभागाच्या वतीनं चिखलदऱ्यात 'निवडुंग उद्यान' विकसित करण्यात आले. मात्र, 2020 मध्ये सारं उद्यान उध्वस्त झालं. खरंतर विविध प्रकारच्या निवडुंगांनी चिखलदरा आणखी सुंदर होऊ शकतो. विदर्भातील हे थंड हवेचं ठिकाण निवडुंगांनी सजावं, अशी अपेक्षा पर्यावरण आणि निसर्गप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
दीडशे वर्षांपूर्वीचं निवडुंग ठरतो आकर्षण : चिखलदरा येथे इंग्रजांनी विशिष्ट परिसरात निवडुंग विकसित केले. विशेष म्हणजे इंग्रजांनी निवडुंग विकसित करण्यासाठी हा परिसर शंभर वर्षांसाठी लीजवर घेतला होता. त्यावेळी अमेरिकेतून निवडुंगाच्या काही प्रजाती चिखलदरा येथे आणून त्या लावण्यात आल्या. यापैकीच निवडुंगाच्या दोन पैकी एक निवडुंग हे निवडुंग परिक्षेत्र परिसरात आणि दुसरं वनविभागाच्या उद्यान परिसरात होतं. या दोन्ही निवडुंगाची उंची 25 ते 30 फूट गेली. शंभर वर्षांनंतर वनविभागानं इंग्रजांना या उद्यानासाठी लिज वाढवून देण्यास नकार दिला. "या परिसरात इंग्रजांनी दीडशे वर्षांपूर्वी लावलेलं एक निवडुंग आकर्षणाचं केंद्रबिंदू असलं तरी निवडुंग विकासाबाबत योग्य विचार झाला असता, तर हा परिसर विविध प्रजातींच्या निवडुंगांनी आता सजला असता, असं पर्यावरण प्रेमी आणि 'ऑर्गनायजेशन फॉर कुला' या सामाजिक संस्थेचे प्रमुख राकेश महल्ले म्हणाले.
निवडुंग उद्यान झालं ओसाड : ज्याप्रमाणं इंग्रजांनी चिखलदरा येथे निवडुंग उद्यान विकसित केलं. त्याप्रमाणं 2015 मध्ये चिखलदरा येथे नव्यानं निवडुंग उद्यान विकसित करण्यासंदर्भात अमरावती जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 2017 मध्ये अतिशय छानसं निवडुंग उद्यान चिखलदरा येथे विकसित करण्यात आलं. राजस्थान मधून सुमारे पाच ते सहा ट्रक विविध प्रजातीचे निवडुंग आणण्यात आले. विशेष म्हणजे निवडुंगावर प्रयोग करणारी यंत्रणा देखील या ठिकाणी विकसित करण्यात आली. निवडुंगाची लागवड नेमकी कशा पद्धतीनं करावी, यासाठी या उद्यानात विशेष व्यवस्था करण्यात आली. निवडुंग उद्यानामुळं चिखलदऱ्याला आणखी नवी ओळख मिळेल, असं वाटत असताना 2020 पर्यंत निवडुंग उद्यान अगदी उध्वस्त झालं. खरंतर या उद्यानाच्या विकासासाठी शासनाकडून जो निधी मिळणार होता. तो निधीच प्राप्त झाला नाही. यामुळं निवडुंगाचा हा प्रकल्प बंद पडला, अशी माहिती वनविभागातील अधिकाऱ्यानं दिली.
प्रकल्प पुन्हा व्हावा सुरू : "वनविभागाच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणींवर मात करून निवडुंगाचा हा सुंदर प्रकल्प पुन्हा नव्या दमान चिखलदरा येथे सुरू व्हावा. ब्रिटिशांनी लावलेलं दीडशे वर्षांपूर्वीचा निवडुंग आज या ठिकाणी उभा आहे. त्या निवडुंगाकडं एक सुंदर कलाकृती म्हणून सगळे पाहतात. आता पुन्हा एकदा वनविभागानं निवडुंगाची छानशी कलाकृती चिखलदरा येथे विकसित व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. निवडुंग उद्यान जर चिखलदरा येथे झाले तर पर्यटनाला चालना मिळेलआणि दुर्मिळ विषय असल्यामुळं लोकांमध्ये या उध्यानाला भेट देण्याची उत्सुकता वाढेल", अशी अपेक्षा राकेश महल्ले यांनी व्यक्त केली.
अनेक भागात शेतीला निवडुंगाचं कुंपण : मेळघाटातील चूर्णी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतील चक्क निवडुंगाचं कुंपण घातलंय. निवडुंगाच्या कुपणामुळं जंगली श्वापदं शेतात येत नाही. यामुळं शेतातील पिंकांचं नुकसान होत नाही. "मेळघाटात पूर्वी प्रमाणे निवडुंग वाढले, तर ते मेळघाटच्या दृष्टीनं लाभदायक ठरणारं आहे", असं पाणी फाउंडेशनचे वैभव नायसे यांनी सांगितलं.
हेही वाचा -