मुंबई Sanjay Raut On BJP :झारखंडमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'काही लोक आधी सुपरमॅन, त्यानंतर पूजनीय आणि पूजनीय नंतर देव बनू पाहात आहेत'. असं विधान केल होतं. मोहन भागवत यांनी यात कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचं संजय राऊत म्हणालेत. मोहन भागवत यांच्या या विधानानंतर आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. शुक्रवारी सकाळी ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.
संजय राऊतांचा मोदींना टोला : "देशात एक व्यक्ती आहे जी स्वत:ला विष्णुचा तेरावा अवतार समजते. त्या व्यक्तीला असे वाटते की मीच प्रभू श्रीराम यांचं बोट धरून त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो. मी नसतो तर भगवान श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. ती व्यक्ती स्वत:ला सुपरमॅन समजते. स्वतःला अजैविक पद्धतीने जन्माला आलो म्हणजे मला वरून देवाने जन्माला घातलंय असं म्हणत देशातील लोकांना भ्रमित करते. रशिया आणि युक्रेनचं युद्ध मीच थांबवलं असं म्हणत आहे. परंतु ती व्यक्ती मणिपूर आणि जम्मू कश्मीरमधील हिंसाचार थांबवू शकत नाही." असा टोला राऊतांनी लगावला आहे.
बहुमताची सतरंजी कॉमनमॅनने खेचली : "मला असं वाटतं त्याच व्यक्ती विषयी मोहन भागवत बोलले आहेत. काही व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजतात. पण पण या सुपरमॅनच्या पायाखालची बहुमताची सतरंजी कॉमनमॅनने खेचून घेतली. त्यामुळे कॉमनमॅनच सुपरमॅन आहे असं आम्ही मानतो. मोहन भागवत यांनी जे मत व्यक्त केलं आहे, त्यावर देशाने आणि भारतीय जनता पक्षानेही चिंतन केलं पाहिजे." असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
रेल्वेमंत्र्यांवर टीका :रेल्वेच्या वाढत्या अपघातांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंत्री पदाची सुत्रं हातात घेतल्यापासून रेल्वे अपघातांची मालिका सुरू आहे. आतापर्यंत 325 प्रवासी रेल्वे अपघातात मरण पावले आहेत. हा आकडा अत्यंत गंभीर आहे. सरकार बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, सुपरफास्ट ट्रेन आणत आहे, पण सामान्य जनता ज्या लोकल ट्रेन मधून किंवा ज्या पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करते, त्याच्या सिग्नल यंत्रणेसाठी, रुळांसाठी काहीही करायला तयार नाही. तुम्ही बुलेट ट्रेनचा दिखावा करत आहात. त्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातोय. पण सर्वसामान्य प्रवाशांसाठी सरकारकडे कुठल्याच योजना नाहीत, ही रेल्वेसुद्धा श्रीमंतासाठी चालवायची,".
मुंबई, कोकणात शिवसेनेची ताकद : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जागावाटपाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यात 288 जागा आहेत. प्रत्येक पक्षाला महाराष्ट्रात आपली ताकद किती आहे हे दाखवण्याचा अधिकार आहे. म्हणून प्रत्येक पक्ष याबाबत आढावा घेत आहे. त्यानंतर आम्ही बसून आणि जागावाटपाचा निर्णय घेऊ. मुंबईच्या जागांबाबत सध्या कुठलाही निर्णय झालेला नाही. परंतु मुंबई हा नेहमी शिवसेनेचा गड राहिला आहे. मुंबई महानगरपालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल आम्ही जास्त जागा इथे जिंकत आलो आहोत. विदर्भात काँग्रेस मजबूत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांची ताकद आहे. म्हणून प्रत्येकाचा एक गड असतो त्या पद्धतीनं मुंबई, कोकणामध्ये शिवसेनेची ताकद राहिली आहे आणि तशाच पद्धतीनं जागावाटप होईल. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे. तो चेहरा कोणाचा आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असं अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हेच असतील, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा
- विधानसभा निवडणुकीकरिता भाजपाची काय असणार रणनीती? कोअर कमिटीच्या बैठकीतून बाहेर आली खदखद - BJP CORE COMMITTEE MEET
- प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले! आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हे शिर्डीत वर्ग करण्याचे न्यायालयाचे निर्देश - Jitendra Awhad News
- विधानसभेसाठी शिवसेनेची रणनीती ठरली; 'इतक्या' जागा लढवण्याचे दिले संकेत - CM Eknath Shinde