मुंबई Sanjay Raut On Narendra Modi : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत हे नेहमीच आपल्या रोखठोक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करत त्यांना दंश करणारा साप म्हटलंय. मोदींचा उल्लेख 'दंश करणारा साप' असा करत ते वारंवार सर्वांना दंश करत असल्याची टीका त्यांनी केलीय. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.
काय म्हणाले राऊत? : आज (18 मे) मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, "भाजपा, मिंधे गट आणि अजित पवारांचा गट यांचं मुख्य हत्यार या लोकशाहीत पैसे वाटप करणं आणि धमक्या देणं हेच आहे. अजित पवारांनी बारामतीत कसे पैसे वाटले हे आपण बघितलंय. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून 19 पैशांच्या बॅग कशा उतरल्या ते मी दाखवलं. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी रुपये यांनी पोहोचवलेत." तसंच मागं पुढं पोलिसांच्या गाड्या आणि पोलीस संरक्षणामध्ये या पैशांचं वाटप होत असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी यावेळी केला.
पुढे ते म्हणाले की, "काल मुलुंडमध्ये शिवसैनिकांनी हा प्रकार रंगेहाथ पकडला. निवडणूक आयोग यावर काय करतंय? नरेंद्र मोदींनी मुंबईत रोड शो केला. हा भाजपाचा प्रायव्हेट प्रचाराचा कार्यक्रम होता. त्यामुळं त्यांच्या रोड शो चा खर्च त्यांच्या पैशातून व्हायला पाहिजे होता. परंतु, जो पैसा खर्च झाला तो पैसा मुंबई महानगरपालिकेनं खर्च केला. मुंबई महानगरपालिकेनं तब्बल तीन कोटी 56 लाखाचा खर्च यांच्यावर केला. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुंबईकरांच्या खिशावर भार टाकला जात असून भाजपाकडून हा पैसा वसूल केला पाहिजे. तसंच त्यांच्यावर काय कारवाई केली हे देखील निवडणूक आयोगानं सांगितलं पाहिजे."