महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मतांसाठी लाडक्या बहिणींना धमकी, राजकीय दबाव तंत्राचा वापर, संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल - LADKI BAHIN YOJANA

शिवसेना(उबाठा) खासदार संजय राऊत यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. या योजनेच्या माध्यमातून महिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

Sanjay Raut criticized Mahayuti Govt over Dhananjay Mahadik statement regarding Ladki Bahin Yojana
संजय राऊत, धनंजय महाडिक (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2024, 2:05 PM IST

मुंबई :'लाडकी बहीण योजने'चा लाभ घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढायचे आणि आमच्याकडं द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करू, असं वक्तव्य भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय. महाडिक यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा महायुती सरकारवर निशाणा साधण्यात आला. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही यावरुन महायुतीवर टीकास्र सोडलंय.

काय म्हणाले संजय राऊत? :यासंदर्भात आज (10 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, "राज्यातील महिला, माता आणि भगिनी यांच्यावर भाजपाचं विशेष प्रेम आहे. ते आता दिसतंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून ते आता माता-भगिनींना धमक्या देत आहेत. त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं योजनेच्या लाभार्थी महिला जर दुसऱ्या पक्षाच्या रॅलीत दिसतील तर त्यांचे फोटो काढा, असं हे म्हणत आहेत. ही योजना फक्त तीन महिन्यांसाठी असून त्यानंतर ही बंद करण्यात येईल", असा आरोप संजय राऊतांनी केला.

महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये देणार : "पंधराशे रुपयांमध्ये मत विकत घेण्याचा सरकारचा डाव आहे. परंतु, महाविकास आघाडीनं जे पंचसूत्र जाहीर केलंय. त्यात महिलांना 'महालक्ष्मी योजने'च्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. पण आम्ही हे पैसे दिल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढणार नाही. तर त्यांचं जीवनमान कसं उंचावता येईल हे बघणार आहोत".

सरकार कुणाच्या बापाचं नाही : काही महिला लाडकी बहीण योजनेचं लाभ घेतात. पण गुणगान मात्र महाविकास आघाडीचं गातात, असं धनंजय महाडिक यांनी म्हटलंय. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "सरकार कुणाच्या बापाचं नाहीय. तर सरकार हे जनतेचं आहे. या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे स्वतःच्या घरातील पैसे देत नाहीत. विशिष्ट जमीन विकून त्यांनी महिलांना पैसे दिले असंही नाही. जनतेच्या करातून या योजनेचे पैसे दिले जाताय."

...हा पट्ट्या वाईटावरच उठलाय : शरद पवार सत्तेतून बाहेर गेल्यानंतर हा पट्ठ्या काम करायला समर्थ आहे, असं अजित पवार म्हणालेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "हा छोटा पट्ठ्या शरद पवारांच्या वाईटावरच उठलेला आहे. परंतु, अशा शापानं काही होत नाही. तसंच आगामी काळात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे सत्तेत नसतील. इतकंच काय तर विरोधी पक्षातही एकनाथ शिंदे नाही, तर केवळ देवेंद्र फडणवीसच दिसतील", असा टोला राऊतांनी लगावला.

हेही वाचा -

  1. लाडक्या बहिणींना धनंजय महाडिकांकडून सभेतच दम, माफी मागताना म्हणाले, "व्होट जिहाद.."
  2. लाडकी बहीण योजनेला ब्रेक? मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं
  3. लाडकी बहीण अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत?; 'या' स्टेप करा फॉलो, खात्यात येतील पटकन पैसे

ABOUT THE AUTHOR

...view details