पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. तर दुसरीकडे दोन्ही बाजूंनी सत्ता येण्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच आज पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत आले होते. यावेळी बोलताना संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरचं पार्सल म्हणत डिवचलं.
...तेव्हा आपला उमेदवार विजयी होतो :"चंद्रकांत मोकाटे हे भूमिपुत्र आहेत. कोथरूडकरांनी भूमिपुत्राला निवडून द्यायचं की कोल्हापूरचं पार्सल परत पाठवायचं हे ठरवायचं आहे," असं म्हणत संजय राऊतांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. "याआधी चंद्रकांत मोकाटे एकदा निवडून आले आहेत. त्यांना ऐनवेळी तिकीट देण्यात आलं. 17 तारखेला उद्धव ठाकरे यांची शेवटची सभा पुण्यात आहे. आपण शेवटची सभा पुण्यात घेतो, तेव्हा आपला उमेदवार विजयी होतो आणि आता देखील तसंच होणार," असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला (Source - ETV Bharat Reporter) आमचा स्ट्राइक रेट चांगला : "सरकारमध्ये पुण्याला स्थान मिळायचं असेल, तर चंद्रकांत मोकाटे यांना निवडून द्यावं लागेल. पुण्यात आपल्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत. जेवढ्या जागा आम्हाला दिल्या तिथं आमचा स्ट्राइक रेट चांगला आहे. त्यामुळं चंद्रकांत मोकाटे यांना विजयी करून विधानसभेत पाठवायचं," असं आवाहन संजय राऊत यांनी जनतेला केलं.
संजय राऊतांचा सूर बदलला : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच (उबाठा) होईल, असं वारंवार सांगणारे संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुक शेवटच्या टप्प्यात येताच आपला सूर बदलला आहे. "राज्यात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचेच सरकार येणार असून इकडची दुनिया तिकडे होईल, पण मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल, असं ते म्हणाले. "शहरात कोयता गॅंग आहेच. पुणे शहरात अनेक ठिकाणी मारामारी तसंच अनेक घटना घडतायत. याची काही जबाबदारी पालकमंत्र्यांवर आहे की नाही? आता जनता जागृत झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. पुन्हा आपल्या हातात सत्ता येईल आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल," असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
- पत्नीला ट्रोल करणाऱ्यांविरोधात देवेंद्र फडणवीस संतप्त, म्हणाले, "काँग्रेसच्या ट्रोल आर्मीकडून..."
- आली रे आली आता तुमची बारी आली; मनसे आमदार राजू पाटील यांचा शिंदे पिता पुत्रांविरोधात 'एल्गार'
- 'याच दाढीमुळे यांची गाडी खड्ड्यात गेली'; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका