शिर्डी : विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला जोरदार यश मिळालं, त्यामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला. त्यात आज शिर्डीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या तुफान फटकेबाजीनं विरोधकांची लक्तरं काढली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मिळालेलं यश हे केशव म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माधव म्हणजेच अमित शाह यांच्यासह कार्यकर्त्यांमुळे मिळाल्याचं सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात प्रचंड वोट जिहाद असल्याचं नमूद करुन फेक नरेटीव्हवरही भाष्य केलं. त्यासह बांगलादेशातील घुसखोरीवरुनही त्यांनी हल्लाबोल केला. विरोधकांचा पराभव झाल्यानंतरही कारवाया थांबल्या नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
पुन्हा एकदा समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा मोठा पराभव झाला. मात्र विरोधकांच्या कारवाया थांबल्या नाहीत. अराजकतावादी तत्वाच्या लोकांकडून सामाजिक विण खराब करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र आमची अराजकतावादी तत्वाविरोधात लढाई सुरू आहे. अनेक घटना होतात, त्याचे पडसाद उमटतात. मात्र त्याचा उपयोग करुन अराजकतावादी लोक आपली पोळी भाजून घेतात. समाज एकसंघ राहिला पाहिजे. आपण नवीन महाराष्ट्र घडवतोय, त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही. मात्र पुन्हा समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्रात वोट जिहाद, हजारो बांगलादेशींना मिळत आहेत जन्मदाखले : महाराष्ट्रात वोट जिहाद मोठ्या प्रमाणात होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. याबाबत बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वोट जिहाद सुरू आहे. हजारो बांगलादेशी घुसखोरांना कागदपत्रं बनवून देण्यात येत आहेत. भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगावमध्ये हजारो बांगलादेशींना जन्म दाखले देण्यात येत असल्याचं उघड केलं. त्यामुळे या घुसखोरांना हाकलून लावणार आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साईचरणी; म्हणाले 'समाजातील दुफळी लवकर दूर करण्यासाठी सरकार करणार प्रयत्न'
- संजय राऊत रिकामटेकडे, मला कामं आहेत: महाराष्ट्राला प्रगतीकडं नेणं ध्येय, देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार हल्लाबोल
- "...तर कदाचित अमृतानं माझ्याशी लग्न केलं नसतं", मुलाखतीत 'दिलखुलास देवाभाऊ', विविध प्रश्नांवर मारले षटकार