मुंबई -संपूर्ण खिचडी घोटाळा चोरी प्रकरणाचे मास्टर माईंड हे संजय राऊत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी केला. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांची पत्नी, मुलगी, भाऊ त्याचबरोबर त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा काँग्रेसचे माजी खासदार निरुपम यांनी केला.
मुंबईत गाजत असलेल्या खिचडी घोटाळा प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टीझाली होती. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी एक कोटी रुपयांची दलाली घेतली असल्याचा आरोप करत ईडीनं त्यांना अटक करावी, अशी निरुपम यांनी मागणी केली.
संजय राऊत यांनी कुटुंबीयांना लाभ करून दिला-काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम म्हणाले, " खिचडी बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट हे सह्याद्री रिफ्रेशमेंट या कंपनीला देण्यात आलं होतं. ३३ रुपयामध्ये ३०० ग्रॅम खिचडी अशा पद्धतीचे हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. परंतु हे कॉन्ट्रॅक्ट सह्याद्री रिफ्रेशमेंट यांनी न करता ते दुसऱ्या कंपनीला देण्यात आलं. त्याचबरोबर १६ रुपयांमध्ये १०० ग्रॅम खिचडी अशा पद्धतीने त्याच वाटप करण्यात आल्याचा आरोपही संजय निरुपम यांनी केला. संजय राऊत यांचे नाव थेट या घोटाळा प्रकरणाशी जोडले गेले नाही. तरी सुद्धा त्यांनी या घोटाळ्यामध्ये आपली पत्नी, मुलगी व भाऊ यांना लाभ करून दिला आहे. त्यांच्या खात्यामध्ये या घोटाळ्याचे पैसे जमा झाल्याची आकडेवारीही निरुपम यांनी दिली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती ईडीला असल्याचंही ते म्हणाले आहेत. या प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी करून त्यांना अटक करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली. पुढे निरुपम म्हणाले, " अमोल कीर्तीकर यांनी तुरुंगामध्ये जाण्यासाठी नवीन कपडे घेतले आहेत. नॉनव्हेज सुद्धा बंद केलं आहे. तुरुंगामध्ये सर्व काही भेटतं. तिथे त्यांचे कपडे घालावे लागतात," असा टोलाही त्यांनी अमोल कीर्तीकर यांना लगावला आहे.
अमोल किर्तीकर हे गजानन कीर्तिकर यांचे पुत्र-कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होते. या कॉन्टॅक्टमध्ये अनियमितता होऊन यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेसोबत अंदाजे ६ कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याचा ईडीचा दावा आहे. या संदर्भात अमोल कीर्तिकर यांची ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी २७ मार्च रोजी अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काही तासातच त्यांना ईडीनं खिचडी घोटाळा प्रकरणात समन्स पाठवलं होतं. अमोल कीर्तीकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील गजानन कीर्तिकर हे सध्या एकनाथ शिंदे गटासोबत आहेत.
हेही वाचा-
- दोन महिन्यानंतर संजय राऊत शिवसेना ठाकरे गटात राहणार नाहीत - नारायण राणे - Narayan Rane
- संजय निरुपम यांनी आज घोषणा करण्यापूर्वीच काँग्रेसनं दाखवला घरचा रस्ता, 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी - Sanjay Nirupam News