कोल्हापूर Sanjay Mandlik On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'नं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संजय मंडलिक यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना ओपन चॅलेंजही दिलं.
काय म्हणाले संजय मंडलिक? : यावेळी बोलत असताना संजय मंडलिक म्हणाले, "केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यातील महायुतीकडून राज्यातील सर्व लोकसभा जागांवर लक्ष केंद्रित केलं जातय. प्रत्येक जागा महायुतीसाठी महत्त्वाची आहे. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अर्धा डझनहून अधिक मंत्री कोल्हापुरात मी आणि धैर्यशील माने निवडून यावेत यासाठी फिल्डिंग लावताय. केंद्र आणि राज्य सरकारनं केलेल्या विकास कामांच्या बळावर जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम गेल्या पंधरा दिवसांपासून जोमानं केलं जातंय." तसंच अजूनही आठ दिवस बाकी असून या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मंडलिक यांनी सांगितलं.
शरद पवारांना दिलं ओपन चॅलेंज : सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी कंबर कसली आहे. तसंच शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात घेण्यात आलेल्या सभेत बोलत असताना शरद पवारांनी 'मान गादीला मत मात्र शेतकऱ्याला' असं आवाहन केलं होतं. यावरुन हे हेच वाक्य शरद पवार यांनी कोल्हापुरात येऊन म्हणावं, असं ओपन चॅलेंज संजय मंडलिक यांनी पवारांना दिलय.