मुंबई- नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मंगळवारी (14 जानेवारी) रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या संक्रांतीच्या सणादिवशी एकमेकांना तीळगूळ वाटण्यात येतात. तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला, असं म्हणत सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देतात. मात्र या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंगबाजीसुद्धा केली जाते. उत्साही लोक सणाचा आनंद लुटण्यासाठी हवेत पतंग उडवतात. परंतु या पतंगबाजीमुळे अनेक पक्ष्यांना, प्राण्यांना आणि माणसांनाही आपला जीव गमावावा लागतो. त्यामुळे ऑनलाइन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा. तसेच मांजाबाबत समाजात जनजागृती करा आणि ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यावर तात्काळ कडक कारवाई करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिलेत.
पक्षी, प्राण्यांना जीव गमवावा लागतो : एकीकडे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळगूळ वाटून हा गोड सण साजरा करतो. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतो. मात्र दुसरीकडे पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हा नायलॉनचा मांजा पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या पायात किंवा शरीरातील कुठल्याही अवयवांमध्ये अडकल्यानंतर तो पक्षी, प्राणी किंवा माणूसदेखील जखमी होतो. परिणामी शरीराच्या अवयवाला इजा होऊन त्यातून रक्तस्त्राव होतो. यामुळं अनेक पक्षी मृत्युमुखी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणून ऑनलाईन नायलॉन मांजा विक्रेत्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिलेत.
समाजात जनजागृती होण्याची गरज : दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाईन नायलॉन मांजा उपयोगावरील प्रतिबंधात्मक कारवाईबाबत ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतली. या बैठकीला मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, धुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे, पुणे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार, जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नकाते, ठाणे पोलीस आयुक्त प्रशांत परबकर, नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आदी ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते. नायलॉन मांजाच्या उपयोगाबाबत आणि यामुळे होणारे घातक परिणाम याबाबत समाजात जनजागृती होण्याची गरज आहे. मोठ्या शहरात गर्दीच्या ठिकाणी लाऊड स्पीकर, मोठे पोस्टर्स आदी द्वारे नायलॉन मांजाच्या वापराबाबत जनजागृती केली पाहिजे, अशीही बैठकी चर्चा झाली.
सणाला गालबोट लागणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या : खरं तर मकर संक्रांत हा सण साजरा होताना उत्साह कमी होणार नाही किंवा सणाला गालबोट लागणार नाही, याची प्रत्येकाने काळजी कशी घेतली पाहिजे, याबाबत नीलम गोऱ्हे यांनी सूचना दिल्यात. तसेच ऑनलाईन नायलॉन मांजा विक्री, उत्पादन आणि मांजामुळे घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात यावा, जेणेकरून लोकांना तात्काळ यावर संपर्क साधण्यात मदत होईल. तसेच वाहतूक पोलिसांनीही मांजाच्या कारवाईबाबत अलर्ट राहिले पाहिजे. रस्त्यावर आपत्कालीन पथकाची नेमणूक करण्यात आली पाहिजे. वेगात वाहन चालवत असताना गळ्यात मांजा अडकून अनेक दुर्घटना घडतात. अशा वेळी जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पाहिजे. त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे, अशा सूचनाही यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्यात.
हेही वाचा -