नाशिक : रेल्वे स्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना पोळी दिली नाही, म्हणून आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकानं वेटरवर चक्क बंदूक रोखल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. विशाल झगडे असं त्या आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाचं नाव आहे. या प्रकरणी अंगरक्षक विशाल झगडे याच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेटरनं पोळी उशीरा दिली म्हणून रोखली बंदूक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ रामकृष्ण हॉटेलमध्ये पोलीस अमलदार विशाल झगडे हा जेवणासाठी गुरुवारी 9 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता गेला होता. तक्रारदार हॉटेल व्यवस्थापक सागर पाटील यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या सिरॉन शेख यांनी विशाल झगडे याला ऑर्डर घेताना पोळी नसल्याचं सांगितलं. त्यावर विशाल झगडे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी वाद घालत दमबाजी केली. पोलीस अमलदार विशाल झगडे यानं त्याच्या कमरेला असलेली पिस्तूल काढून शेख यांच्यावर रोखली. "मला रोटी पाहिजे तू तिकडे काहीही कर," असं म्हणतं शिवीगाळ केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. सागर पाटील यांनी ही बाब हॉटेल मालक विनोद भगत यांना सांगितली. यावेळी अन्य वेटरनं पंधरा-वीस दिवसापूर्वी याच व्यक्तीनं किरकोळ कारणावरून हॉटेलमध्ये वाद घातला होता, अशी माहिती दिली. बंदूक रोखणारा संशयित नाशिक पोलीस ग्रामीण मुख्यालयातील कर्मचारी आणि आमदार सुहास कांदे यांचा अंगरक्षक विशाल झगडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशाल झगडे याच्यावर गुन्हा दाखल करुन केलं अटक : "हॉटेल व्यवस्थाप सागर पाटील यांनी याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार विशाल झगडे याच्यावर बीएनएस कलम 352, 351 आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल झगडे यास अटक करून नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं दोन्ही बाजुंचा युक्तिवाद एकूण घेत त्याला जामीन मंजूर केला आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
कठोर कारवाई करणार : "नाशिकरोड येथील हॉटेल रामकृष्णमध्ये संशयित पोलीस अमलदार विशाल झगडे यानं वेटरवर रिव्हॉल्वर रोखल्याची घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यावरून संशयित पोलीस विशाल झगडे याचे गैरवर्तन समोर आले आहे. विशाल झगडे याच्या संदर्भातील अहवाल ग्रामीण पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार विशाल झगडे याच्या विरोधात निलंबासह कठोर कारवाई केली जाणार आहे," असं पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :
- बीड जिल्ह्यात 1281 पिस्तूल परवानाधारक; विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्या नागरिकांची संख्या किती?
- बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ; मारेकऱ्यांनी अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन ग्लॉक, टर्कीच्या जिगाना पिस्तूलचा केला वापर
- सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश; तापी नदीत फेकून दिलेली दोन्ही पिस्तूल सापडली - Salman Khan House Firing