मुंबई : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही किंवा तिकीट कापलं गेलं म्हणून अनेक राजकीय पक्षांमध्ये नेत्यांनी बंड केलं आहे. या बंडोबांचा थंडोबा कसा करायचा? हा पक्षासमोर मोठा प्रश्न आहे. दरम्यान, मुंबईत बोरिवली विधानसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी, मुंबादेवी मतदारसंघातून भाजपाचे अतुल शाह यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
सदा सरवणकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज : मुंबईतील माहीम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं त्यांना महायुतीनं पाठिंबा दिला पाहिजे, असं महायुतीतील नेत्यांनी म्हटलंय. यानंतर सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. असा त्यांच्यावर दबाव होता. तरीसुद्धा त्यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून एक भावनिक पोस्ट केली आहे.
सदा सरवणकरांची भावनिक पोस्ट : "मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टानं आणि घामानं तीनवेळा माहीमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितली नसती. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर-माहीममध्ये राहतात. पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहा त्यांचे पुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवलं नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या", असं पोस्टमध्ये सदा सरवणकर यांनी म्हटलय.
सर्वांनी मिळून विजयी का करू नये?: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, "मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी आमच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. म्हणून जर अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असतील तर त्यांना आपण सर्वांनी मिळून विजयी का करू नये? असं भाजपा नेते आशिष शेलारांनी म्हटलंय. मात्र माझा सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला विरोध नाही. परंतु इथे मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी माझी इच्छा आहे. महायुतीनं अमित ठाकरेंना विजयी करण्यासाठी मी महायुतीतील तीन महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करेन, असंही शेलार यांनी म्हटलं होतं." शेलारांच्या वक्तव्यानंतर दीपक केसरकरांनीही सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी असं म्हटलं होतं. हा विरोध असतानाही सदा सरवणकरांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा -
- भाजपाचा मुख्यमंत्री अन् मनसे सत्तेत असेल, राज ठाकरे आताच असं का म्हणाले?
- मतदारसंघ 21 आणि उमेदवार 1272, 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 उमेदवार रिंगणात
- नाम साधर्म्याचा फटका निवडणुकीत राजकीय नेत्यांना बसणार; नावात काय आहे? नव्हे नावातच सर्व काही...