मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सध्या महाराष्ट्रात चांगलंच वातावरण तापलं आहे. या घटनांच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तर या प्रकरणावरुन भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना 'बीडमध्ये कोणते इव्हेंट चालतात...' असं म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे धनंजय मुंडेसोबत नाव जोडण्याचा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केला.
प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही : भाजपा आमदार सुरेश धस यांचा अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या विरोधातील वक्तव्यानंतर शनिवारी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत "आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा मी निषेध करत असून, त्यांनी माझी जाहीर माफी मागावी," अशी मागणी केली. यानंतर आमदार सुरेश धस यांनीही प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही. त्यांनी जर माझा निषेध केला, तर त्यांचा हास्य जत्रा हा कार्यक्रम मी न बघण्याचा निर्णय घेत त्यांचा निषेध करतो असं धस यांनी म्हटलंय होतं.
सचिन गोस्वामी यांनी केली सोशल माध्यमात पोस्ट : बीड हत्या प्रकरणातील आता एकेक बाजू समोर येत असून, सरकार देखील ॲक्शन मोडवर आलं आहे. प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिने उडी घेतली आहे. तर दुसरीकडं महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Director Sachin Goswami) यांनी प्राजक्ता माळी हिच्या समर्थनात आणि तिला पाठिंबा देणारी सोशल माध्यमातून पोस्ट केली आहे.
गोस्वामी यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं? : शनिवारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत राजकीय नेते असो किंवा अनेकांकडून महिला कलाकाराला टार्गेट केलं जातंय. माझ्याबाबतीत चुकीचं घडतंय. यामुळं आमच्या कुटुंबाला त्रास होतोय, असं म्हणताना प्राजक्ता माळी भाऊक झाली होती. प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर तिला पाठिंबा देणाऱ्यामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट करत प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे. "ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आणि क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या", असं दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सभापतींनी कारवाई करावी : एकीकडं आमदार सुरेश धस आणि प्राजक्ता माळी यांचा वाद सुरू असताना आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनीही उडी घेतली आहे. "सुरेश धस कितीही मोठे असले तरी ते आपल्या घरचे. परंतु त्यानी कलाकारांचा अपमान करता कामा नये. अभिनेत्री प्राजक्ता माळी बाबतचे त्यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. ते अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. सुरेश धस यांनी देशातील तीन वेगवेगळ्या राज्यातील कलावंताचा अपमान केला आहे. महाराष्ट्रातील प्राजक्ता माळी, दक्षिणेतील रश्मिका मंदाना आणि उत्तरेतील सपना चौधरी यांच्याबाबत सुरेश धस यांनी वक्तव्य करून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळं असा जो जनतेतून लोकप्रतिनिधी निवडून आला आहे. त्याला आमदार म्हणून राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. याबाबत आम्ही सभापतींना रितसर पत्र लिहून सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे," अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली आहे".
ताई तू याकडं दुर्लक्ष कर : बीड सरपंच हत्याप्रकरणी राज्य सरकार अलर्ट मोडवर आले असून, जे आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर रविवारी अंजली दमानिया ह्या बीडमध्ये जाऊन आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडं आमदार सुरेश धस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या वादावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. "ताई आपण कलावंत आहे, आपण कला क्षेत्रात काम करत असताना अनेकजण आपणाला ट्रोल करत असतात. तू असो काय किंवा मी असो, आम्हाला ट्रोल केलं जातं. आमच्यावर टीका केली जाते. याचा आम्हाला आणि कुटुंबाला मोठा त्रास होतोय. पण ताई तुझे कालचे बोलने मी ऐकले. अत्यंत बरोबर बोललीस तू आणि तुझ्या बाबतीत जे घडतंय ते चुकीचं आहे. पण ताई तू याकडं दुर्लक्ष कर," असं गौतमी पाटील हिने म्हटलं आहे.
'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत?…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 29, 2024
पंकजा मुंडे यांचा साहित्यिक भाषेतून संदेश :''शक्ती शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने soft target आहे स्त्री आणि तिचे सत्व,'' असे म्हणत पंकजा मुंडे यांनी स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवणे किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केले जात असल्याचे आपल्या ट्विटमधून सूचवलं आहे. तसेच, कालच्या घटनेचा संदर्भ बोलताना प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ साहित्यिक शब्दात पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले, असे म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांचं कुठेही नाव घेतलं नाही. पण काल पाहवलं नाही... असे म्हणत कालच्या प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवर भाष्य केलंय.
हेही वाचा -
सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी; आरोपांनंतर प्राजक्ता माळीचं सणसणीत उत्तर, महिला आयोगात तक्रार