मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील चुतुरस्त्र दिग्दर्शकांपैकी एक असलेला, सातत्यानं स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जाणारा आणि सडेतोड भूमिका घेऊन वादातही अडकलेला निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यानं 2024 साल संपण्यापूर्वीच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे अनुराग कश्यपनं मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनुराग कश्यपनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. अनुरागनं मुंबई सोडण्यामागचं कारणही सांगितलं आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये रिस्क फॅक्टर कमी होत असून बॉलिवूड रिमेकवर अवलंबून होत असल्याची चिंताही अनुरागनं व्यक्त केली आहे.
अनुराग कश्यप का सोडतोय मुंबई?
या मुलाखतीत अनुरागनं मुंबई सोडण्यामागचं स्पष्ट कारण सांगितलं आहे. अनुराग म्हणाला, "चित्रपट बनवण्याची क्रेझ माझ्यापासून दूर होत चालली आहे, आजच्या काळात मी बाहेर जाऊन कोणताही वेगळा चित्रपट बनवू शकत नाही, कारण चित्रपट बनण्याआधीच विक्रीची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे आता मी याला कंटाळलो आहे. चित्रपट बनवण्याची इच्छा संपली आहे, म्हणून मी मुंबई सोडून पुढच्या वर्षी दक्षिणेला जात आहे, मला अशा ठिकाणी जायचं आहे जिथे मला काम करण्याचा आनंद मिळेल. नाहीतर मी म्हाताऱ्या माणसासारखा मरेन, मी माझ्या चित्रपटसृष्टीच्या विचारांनी मी अस्वस्थ झालो आहे."
साऊथ सिनेमाचं अनुरागनं केलं कौतुक बॉलिवूड दिग्दर्शक
'महाराजा' या साऊथच्या फिल्ममध्ये अभिनय केलेल्या अनुराग कश्यपनं साऊथ सिनेमावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या टॅलेंट एजन्सींवरही त्यानं निशाणा साधला. गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटासाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक अनुरागनं म्हटलं आहे की, "पहिल्या पिढीसोबत काम करणे खूप अवघड आहे, कारण त्यांना स्टार बनण्याचे भूत पछाडलेले असते, पण अभिनय करण्याची इच्छा नसते. अभिनेता चित्रपटापूर्वी लोकप्रिय होतो. त्यांच्यामध्ये विकृत गोष्टी टाकल्या जातात, त्यांना स्टार बनण्यासाठी काय करावं लागेल हे सांगितलं जातं, पण ते अभिनेत्यांना वर्कशॉपमध्ये पाठवत नाहीत, तर त्यांचे शरीर तयार करण्यासाठी त्यांना जिममध्ये पाठवतात, आता बॉलीवूडमध्ये, फक्त ग्लॅमर एवढंच बाकी आहे."