मुंबई - बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मागील पंधरा दिवसापासून या हत्याप्रकरणी मोर्चे, आंदोलनं होताहेत. तर बीडमधील आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव धनंजय मुंडे यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी आक्रमक होत, सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आपण कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला होता. तसेच प्राजक्ता माळी हिनं राज्य महिला आयोगाकडं तक्रारी दाखल केली होती. पण याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी माफी मागितल्यानंतर आज अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं या प्रकरणावर माझ्याकडून मी पडदा टाकत आहे. याबाबत प्राजक्ताना एक व्हिडिओ जारी केला आहे.
"जेव्हा माझ्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आल्यानंतर मी पत्रकार परिषद घेतली. यानंतर माझ्या पाठिंबासाठी आणि माझ्या समर्थनात अनेक लोकं समोर आली. अगणित फोनकॉल्स, मेसेज करून पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्या सर्वांचे मी धन्यवाद देते. तसेच प्रसार माध्यमांनीही संवेदनशीलता दाखवत बातम्या केला. मुख्यमंत्री महोदयांनीही या प्रकरणाची दखल घेतली, त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते. तसेच राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे आभार मानते. त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई केली", असं प्राजक्ता माळीनं म्हटलं आहे.
"बीडमध्ये घडलेले हत्या प्रकरणानंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी आपल्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर मी याचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर आली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी केली होती. तसेच आपणही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता आमदार सुरेशदादा धस यांनी माझी माफी मागितल्यामुळं मी या प्रकरणावरती पडदा टाकते." अशी भूमिका घेत आमदार सुरेश धस यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचं, प्राजक्ता माळीनं म्हटलं आहे.