मुंबई Mumbai North West Lok Sabha Constituency : महायुतीतील मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश करणारे माजी मंत्री रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना महायुतीकडून उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट जाहीर करण्यात आलंय. त्यामुळं येथे महाविकास आघाडीतर्फे ठाकरेंच्या शिवेसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरुद्ध रवींद्र वायकर असा सामना रंगणार आहे.
गजानन कीर्तिकर यांची माघार :याआधीया मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी ठाकरेंनी त्यांच्या मुलाला म्हणजेच अमोल कीर्तिकर यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्यानं गजानन कीर्तिकरांनी निवडणुकीतून माघार घेतली. गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा झाली. त्यानंतर आता रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं कीर्तिकर विरुद्ध वायकर अशी लढत या मतदारसंघात बघायला मिळणार आहे.
कोण आहे रवींद्र वायकर? : मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून रवींद्र वायकर यांनी 20 वर्ष काम पाहिलंय. मुंबई मधील जोगेश्वरीमधून 1992 साली ते पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. 2006 ते 2010 पर्यंताच्या कार्यकाळात त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलं. त्यानंतर जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून ते सलग 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. राज्यात 2014 साली भाजपा शिवसेनेची युती असताना त्यांनी गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. 2019 साली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ते गृहनिर्माण विभागाच्या राज्यमंत्री पदी विराजमान झाले होते.