साईबाबांच्या मंदिरात रामदास आठवले यांनी घेतलं दर्शन शिर्डी (अहमदनगर) Ramdas Athawale On Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत हा दावा केला होता. भुजबळांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा समोर आल्यानंतर आता आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांना थेट आरपीआय पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.
साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन : केंद्रीय मंत्री रामदास आठवले गेल्या दोन दिवसांपासून शिर्डी दौऱ्यावर आहेत. आज सकाळी आठवले यांनी साईबाबांच्या मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी शॉल, साई मूर्ती देवून आठवले यांचा सत्कार केलाय.
आठवलेंनी भुजबळांना दिली ऑफर : साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "मंत्री छगन भुजबळ ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. ओबीसींच्या प्रश्नांवरूनच त्यांनी शिवसेना सोडली होती. त्यांनी आता मंत्री पदाचा राजीनामा देऊ नये. त्यांनी मंत्रिमंडळात राहिले पाहिजे. मात्र ते भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे. भाजपा पेक्षा ते आरपीआयमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे."
मनोज जरांगे आणि छगन भुजबळ वाद : मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधून त्यांना ओबीसी समाजातून आरक्षण देण्यात आल्यानं मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचंड टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळं मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद रंगला आहे. छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणावर लढा उभारावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यावर छगन भुजबळांनी आपण राजीनामा दिल्याचं स्पष्ट केल्यानं संजय राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.
हेही वाचा -
- मराठा ओबीसी वाद : मंत्री छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून तत्काळ काढून टाका, संजय राऊतांचा हल्लाबोल
- मी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आणि अंबडच्या सभेला गेलो - छगन भुजबळ यांचा मोठा खुलासा
- भाजपाकडून कुठलीच ऑफर नाही; अंजली दमानियांच्या सवालावर छगन भुजबळांचा पलटवार