मुंबई : 2024 हे वर्ष भारतीय चित्रपटांसाठी सुंदर ठरलं आहे. गेल्या वर्षी बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. तसेच 'पुष्पा 2 द रुल' हा 2024 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आता 2025 मध्ये देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई होणार आहे, कारण राम चरण स्टारर 'गेम चेंजर'सह अनेक बिग बजेट चित्रपट नवीन वर्षात रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. साऊथच्या या बिग बजेट चित्रपटांना बॉलिवूडचा कुठले चित्रपट टक्कर देईल, हे जाणून घेऊया.
'द राजा साहब' : गेल्या वर्षी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातून प्रभासनं बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींहून अधिक कमाई केली होती. यावेळी, 'द राजा साहब' हा चित्रपट चालू वर्षात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे बजेट 450 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. 'द राज साहब' हा एक रोमँटिक कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मारुती यांनी केलं आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
गेम चेंजर : साउथ चित्रपटसृष्टीतील 2025चा मोठा चित्रपट 'गेम चेंजर' हा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राम चरण आणि कियारा अडवाणी स्टारर 'गेम चेंजर' 450 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आली आहे. हा चित्रपट 10 जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे. एस. शंकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर हा चाहत्यांना खूप आवडला आहे.
टॉक्सिक : कन्नड सुपरस्टार यश 'टॉक्सिक' नवीन चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचं बजेट 400 कोटींहून अधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
विदामूयारची : तामिळ सुपरस्टार अजित कुमार स्टारर ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'विदामुयार्ची'ची रिलीज डेट निश्चित झालेली नाही. हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज होऊ शकतो. 'विदामुयार्ची' चित्रपट मागिझ थिरुमेनी निर्मित केला आहे. या चित्रपटाचे बजेट 300 कोटींहून अधिक आहे.
थलापती 69 : साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट 'थलपथी 69' देखील चालू वर्षात प्रदर्शित होईल. यानंतर विजय राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. एच विनोदचा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थलपथी 69'चं बजेट 450 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर विजय या चित्रपटासाठी 275 कोटी रुपये फी घेणार असल्याचं बोललं जात आहे.
बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट
सिकंदर : सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'सिकंदर' हा 2025 मधील सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट मानला जात आहे. हा चित्रपट 2025मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'सिकंदर' या चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. सलमान खानच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर 'भाईजान'च्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. 'गजनी'चे दिग्दर्शक ए. आर मुरुगादास हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.
वॉर 2 : यशराज बॅनरचा 'वॉर 2' हा चित्रपट 2025 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. 2019 मध्ये 'वॉर'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता 'वॉर 2' मध्ये हृतिक रोशनबरोबर साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'वॉर 2' या चित्रपटाचं बजेट 200 कोटी रुपये आहे.
हाउसफुल 5 : मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल 5' हा 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. तरण मनसुखानीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. 'हाऊसफुल 5' चित्रपटाचं बजेट 300 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदी खान, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, चंकी पांडे, सोनम बाजवा आणि श्रेयस तळपदे या चित्रपटात प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे.