मुंबई Ramdas Athawale On Raj Thackeray :आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपापली कंबर कसलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा देत महाराष्ट्रात दौऱ्याला सुरुवात केलीय. मात्र, राज ठाकरेंनी सोलापूरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळं आता ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात असताना आरक्षणाची गरज नसल्याचं ते म्हणालेत. त्यामुळं त्यांना आता मराठा आणि ओबीसी समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतय. तसंच मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना राज ठाकरे यांनी असं वक्तव्य केल्यामुळं विरोधकांकडूनही टीका केली जात आहे. त्यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
काय म्हणाले रामदास आठवले :यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रामदास आठवले म्हणाले, "जोपर्यंत जातीय व्यवस्था संपत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आरक्षणासंदर्भात राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्य नाही. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकावा". तसंच दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, या प्रकारची मागणी सर्वप्रथम आपण केल्याचंही यावेळी आठवले यांनी सांगितलं.