मुंबई : महायुती सरकारचा आज (15 डिसेंबर) भव्य-दिव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी कार्यक्रम नागपुरात पार पडला. (16 डिसेंबर) सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. महायुतीच्या 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपा 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर विविध प्रतिक्रिया येत असताना आता आरपीआय पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्या पक्षाला मंत्रिपद न मिळाल्यामुळं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, भाजपा नेत्या नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिपदाची माळ गळ्यात न पडल्यानं नवनीत राणा यांनीही नाराजी व्यक्त केली.
फडणवीसांनी शब्द पाळला नाही : "मंत्रिमंडळ विस्ताराला आमंत्रण दिलं नाही. मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआय पक्षाला एक मंत्रिपद देण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही. त्यामुळं आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत," अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. "मी देवेंद्र फडणवीस यांना दहा वेळा भेटलो होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, या वेळेला तुम्हाला एका मंत्रिपदाचा आम्ही विचार करू. परंतु आम्हाला एकही मंत्रीपद न मिळाल्यानं आमचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आरपीआय पक्ष मोठा आहे, गावागावात अनेक कार्यकर्ते आहेत. परंतु आता मंत्रिपद न मिळाल्यामुळं कार्यकर्ते नाराज झाले असून, मी स्वतः नाराज झालो आहे," अशा शब्दात रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.