प्रयागराज- महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर (mahakumbh 2025 stampede news) भाविकांचा सर्वत्र आक्रोश दिसून आला. अनियंत्रित झालेल्या गर्दीत अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ही चेंगराचेंगरीची घटना कशी घडली? त्याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून जाणून घ्या.
कर्नाटकहून आलेल्या सरोजिनी यांनी चेंगराचेंगरीच्या भयानक दुर्घटनेचा अनुभव सांगितला. त्यांच्या माहितीनुसार त्या ९ जणांच्या गटात महाकुंभ मेळाव्यात आल्या आहेत. संगम येथे आंघोळ करत असताना अचानक भाविकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. सुरुवातीला काही कळण्याचापूर्वीच त्यांना श्वास थांबल्यासारखं वाटू लागलं. त्यांच्यासोबत असलेले २-३ भाविक जखमी झाले. "असे काही घडणार आहे, असे माहित असतं तर मी येथे आले नसते," असे त्यांनी रडत-रडत सांगितलं.
चेंगराचेंगरीत चिरडले गेले- मध्य प्रदेशातील छतरपूर येथून आलेले भाविक जयप्रकाश यांना दुर्घटनेनंतरची परिस्थिती पाहून धक्का बसला. त्यांच्यासोबत सहा जण महाकुंभ मेळाव्यावाला आले आहेत. त्यांच्या माहितीनुसार अचानक गर्दीचा लोंढा आल्यानंतर दुर्घटना घडली. तेव्हा भाविकांना मदत मिळाली नाही. चेंगराचेंगरी होताना सर्वजण चिरडले गेले. अशा परिस्थितीत ते सोबत असलेल्या मुलांना घेऊन गर्दीतून बाहेर पडले. पण, दुर्घटनेत सापडलेल्या आईला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्यांना आईच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. गर्दीत त्यांचे साहित्य मागे पडले आहे.
नातेवाईकासह गळ्यातील हारही हरवला- कोलकाताहून आलेले कृष्णा प्रसाद यांनी चेंगराचेंगरीची दुर्घटना डोळ्यासमोर पाहिली. त्यांच्या माहितीनुसार चार लोकांचा डोळ्यांसमोर पाण्यातच मृत्यू झाला. त्यांची मुले हरवली होती. अशा संकटाच्या काळात पोलिसांनी खूप मदत केली. "काकू हरवल्या आहेत. गळ्यातील हारदेखील हरवला आहे. पण, हार सापडण्याची शक्यता वाटत नाही," अशी भाविकानं हतबलता व्यक्त केली.
हरविलेल्या साहित्याचा शोध सुरू- महाकुंभ मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेल्या दोन कामगारांच्या माहितीनुसार गर्दीमुळे पाऊल ठेवण्याकरितादेखील जागा नव्हती. त्यांनी काही भाविकांना वाचविलं. एक-दोन भाविक पडल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ भाविक पडू लागले होते. रुग्णवाहिका आल्यानंतर रस्ता मोकळा झाला. लोकांचे साहित्य गर्दीत हरविलं आहे. त्यासाठी ते शोध घेत आहेत. पश्चिम बंगालहून आलेला रोहित यांच्या आजीला गर्दीत चक्कर आली. गर्दीचा त्यांना दबाव जाणवत होता. पश्चिम बंगालमधील एका महिला भाविकाच्या माहितीनुसार काही लोकांमध्ये भांडण झालं. त्यानंतर महिलेची आई जमिनीवर कोसळली. अचानक गर्दी वाढल्यानंतर लोक जमिनीवर कोसळत होते. कोणीही मदत करत नव्हते.
हेही वाचा-