दौंड (पुणे)- विद्यार्थ्यानं पालकाची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती विद्यार्थिनीनं वर्गशिक्षकांना दिली. याचा राग मनात धरून विद्यार्थ्यानं त्या विद्यार्थिनीचा बलात्कार करून मारून टाकण्यासाठी शंभर रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हे प्रकरण लपविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि नववीच्या वर्गशिक्षकाविरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार दौंडमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थिनीची सुपारी देण्याचा गंभीर प्रकार घडला. मात्र, शाळेची बदनामी टाळण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वर्गशिक्षिका आणि वर्गशिक्षक यांनी गंभीर प्रकार लपवून ठेवत दुर्लक्ष केले. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
१०० रुपयांची सुपारी का दिली?याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दौड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीनं पालकांसह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुपारी देण्यात आल्याची तक्रार दिली. पोलिसातील तक्रारीनुसार विद्यार्थिनीनं तिच्या वर्गातील विद्यार्थ्यानं पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती वर्गशिक्षिकेला दिली होती. त्याचा राग मनात धरून त्या विद्यार्थ्यानं आणि त्याच्या मित्रानं इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला १०० रुपयांची सुपारी दिली. पीडित विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करून तिला मारून टाकण्यासाठी ही सुपारी दिली. हा प्रकार दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी घडला होता. मात्र, त्या विद्यार्थ्यानं याबाबतची माहिती पीडितेला दिली. पीडितेनं तिच्या घरी ही माहिती दिल्यानंतर त्यांना धक्का बसला. पीडितेच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नसल्यानं दौंड पोलिसांत धाव घेतली.
पीडितेवरच आरोप- पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी महिला सहायक पोलिस निरीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीदरम्यान मुख्याध्यापकांनी पीडितेवर घाणेरडे आरोप केले. पीडितेनंच १०० रुपये दिले होते. पीडित ही विद्यार्थ्यांची बदनामी करत असल्याचं तीन विद्यार्थ्यांसह एका वर्गशिक्षकाकडून लेखी जबाब घेण्यात आले होते. तसेच, मुलीनंच विद्यार्थ्याला १०० रुपये दिल्याचंही मुख्याध्यपकांनी सांगितलं. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी मुलीला दुसऱ्या शाळेत टाका, असे पालकांना सुचविलं. हे गंभीर प्रकरण लपविण्यासाठी आणि शाळेची बदनामी टाळण्यासाठी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांनी कटकारस्थान करून दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. पीडितेचे मानसिक आणि शैक्षणिक नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत २५ जानेवारी रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकांनो मुलांकडं लक्ष द्या-शालेय विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनीची सुपारी देण्याच्या प्रकरणानं पालकवर्गात चिंतेचं वातावरण आहे. या प्रकरणाबाबत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार म्हणाले, पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहोत."
मुलांमधील गुन्हेगारीची असो की असुरक्षिततेची भावना निर्माण न होण्यासाठी पालकांनी काळजी घ्यावी, असा मानसिक समुपदेशक सल्ला देतात. जाणून घ्या मुलांच्या संगोपनासाठी महत्त्वाच्या टिप्स
- पालकांनी नेहमीच घरातील वातावरण आदरयुक्त, आनंदी आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या वातावरणात मुलामध्ये आनंद, आदर, समाधान आणि सुरक्षिततेच्या भावना विकसित होतात. त्यामुळे गुन्हेगारीची मानसिकता मुलांमध्ये निर्माण होणार नाही.
- तुम्ही तुमच्या मुलासोबत नियमितपणे चांगला वेळ घालवला पाहिजे, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांचे म्हणणं ऐकलं पाहिजे. असे केल्यानं पालक आणि मुलांमधील नाते अधिक मजबूत होतं.
- मुलाच्या चांगल्या वृत्तीकडे किंवा त्यांच्या सकारात्मक वर्तनाकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. मुलामध्ये नकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊ नये, याकरिता बरोबर आणि चूक यातील फरक त्यांना समजून सांगायला हवा.
- पालक मुलांवर ओरडून आपला राग व्यक्त करू लागतात. त्यामुळे मुलांच्या कोमल मनावर परिणाम होतो. त्यांच्या वागण्यात रागीटपणा आणि हट्टीपणा वाढतो. त्याचवेळी, पालक आणि मुलांच्या नात्यात अंतर आणि आदराची भावना कमी होते. शक्यतो पालकांनी मुलांवर न ओरडता त्यांचा दृष्टिकोन आणि भावना समजून घेतल्या पाहिजेत.