मुंबई : सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी शनिवारी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
तुतारीसोबत जाण्याचा आग्रह : गेल्या काही काळापासून शिंगणे हे शरद पवारांकडं परत येतील, अशी चर्चा होती. राजकारणात आल्यावर १९९२ पासून शरद पवारांसोबत काम करत आहे. अपक्ष आमदार म्हणून १९९५ मध्ये निवडून आल्यानंतरही पवारांसोबतच राहिलो होतो. मात्र, मध्यंतरी बँकेला वाचवण्यासाठी अजित पवारांसोबत जावं लागल्याची कबुली यावेळी शिंगणे यांनी दिली. शिंगणे यांनी पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर अजित पवारांनी देखील शिंगणे यांच्याशी संवाद साधला होता. मात्र, कार्यकर्त्यांचा देखील तुतारीसोबत जाण्याचा आग्रह असल्याची माहिती, शिंगणे यांनी यापूर्वी दिली होती.
जिल्हा बॅंक वाचवण्यासाठी त्यावेळी अजित पवारांसोबत गेलो. मात्र, आता महाराष्ट्राला वाचवण्याची वेळ आली आहे. त्यामुळं शरद पवारांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. - राजेंद्र शिंगणे, आमदार