नागपूर : विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) झाल्यापासून महाविकास आघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं जातंय. त्यामुळं महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत फूट पडणार, अशा चर्चा सुरू होत्या. असं असतानाच आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केलीय.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : या संदर्भात नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, "नागपूरपासून ते मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचंय. जे काही होईल ते होईल. आम्ही मुंबई ठाणे आणि नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी देणार आहोत. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळं पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. लोकसभेमध्ये इंडिया आघाडी स्थापन केली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली होती. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवू."
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका : राजकारणात काहीही शक्य असल्याचं, वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, "कोण कुठं जाणार,कोण कुठं येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाही. प्रत्येक पक्षाची एक भूमिका आणि आयडिओलॉजी असते. तुम्ही आमच्या पक्षाला तोडलंय, ते कुठल्या आयडिओलॉजीत बसतं? जर राजकीय तुरुंगात टाकण्याची परंपरा तुम्ही सोडणार असाल, तर आम्ही तुमचं स्वागत करू."
राजकारणात कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतो : पुढं ते म्हणाले, "राजकारणात कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतोच. आम्ही 25 वर्ष मित्रच होतो. आम्ही भाजपाचे सर्वात विश्वासपात्र मित्र होतो. मात्र, आता मित्र राहिलो नाही. महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते राहिले त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही. सेंट्रल एजेंसीचा वापर करून विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावला नाही. याची सुरुवात महाराष्ट्रात भाजपानं केली. ते आता सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन साधणार असतील, तर आम्ही त्यांचं स्वागत करू. हे काही संकेत नाही. महाराष्ट्राचे राजकीय वातावरण गढूळ असू नये असे आमचे प्रयत्न आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाकडून आम्हाला चांगल्या अपेक्षा होत्या. मात्र, त्या काळात काही लोकांनी फडणवीसांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली."
हेही वाचा -