मुंबई Raj Thackeray meets Amit Shah : 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघ्या महिनाभराचा अवधी उरलेला असताना राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळतंय. महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे चा समावेश करण्यासाठी संघाकडून हिरवा कंदील भेटल्यानंतर आता भाजपा सक्रिय झाला आहे. याच अनुषंगानं काल रात्री दिल्लीत दाखल झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (19 मार्च) दुपारी केंद्रीय गृहमंत्री तसंच भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. या भेटीदरम्यान भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. विशेष म्हणजे काल दिल्लीत दाखल झालेले भाजपाचे जेष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या भेटीसाठी उपस्थित नव्हते. तर ते आज सकाळीच मुंबईत दाखल झाले. यावरून देवेंद्र फडवणीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अनुपस्थित झालेल्या या बैठकीत राज ठाकरे यांना काय आश्वासन देण्यात आलं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे.
मनसेला सोबत घ्या, संघाचा हिरवा कंदील :एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे असल्याचा दावा भाजपा वारंवार करत असल्यानं त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानं याचा फायदा राज ठाकरे यांच्या मनसेला होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे सोबतीला आले तर त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसेला महायुतीत घेण्याची इच्छा एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केली आहे.
उमेदवार मनसेचा चिन्ह कमळ : मनसेनं राज्यामध्ये लोकसभेच्या दोन जागांची मागणी केल्याची माहिती आहे. नाशिक आणि दक्षिण मुंबई या दोन जागा मनसेला हव्या आहेत. परंतु मनसेच्या उमेदवाराने भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट भाजपाकडून मांडण्यात आली आहे. ती कदापी राज ठाकरे यांना मान्य नाही. अशा परिस्थितीत तोडगा म्हणून निदान दक्षिण मुंबईच्या जागेवर मनसेच्या उमेदवारानं भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि नाशिक मध्ये त्यांनी मनसेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी यावरही चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबईत सध्या उबाठा गटाचे शिवसेनेचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. या जागेवर एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. परंतु या जागेवरून भाजपाचे विद्यमान आमदार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. पण संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला तर येथून मनसेचे बाळा नांदगावकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी महायुतीकडून करण्यात येत आहे.
तसंच एकनाथ शिंदे गटानं मुंबईतील मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर पश्चिम या दोन जागा भाजपासाठी सोडल्या असून त्या बदल्यात त्यांनी ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेची मागणी केली आहे. म्हणून ही जागा भाजपाची असल्यानं मनसे उमेदवारानं येथून भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी भाजपाची इच्छा आहे. परंतु यासाठी राज ठाकरे यांची भूमिका अद्याप समोर आली नाही. आजच्या बैठकीत याविषयीच चर्चा झाल्याची शक्यता आहे.