मुंबई - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, भाजपा आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात विविध आरोप केलेत. याच हत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर मोक्का लावण्याचे आदेश दिलेत. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुख्य आरोपीला सोडून इतर आरोपींवर कारवाई सुरू असल्याची टीका राऊतांनी केलीय. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्याच्या वाटेवर ठाकरे गट असून, यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद पाहायला मिळत आहेत.
मुख्य आरोपीला सोडलं जातंय : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री बोलतात की, आम्ही कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला सोडलं जातंय आणि इतर दुसऱ्याच आरोपींना मोक्का लावला जातोय. मुख्य आकाला स्वतःकडे ठेवायचं. यावर आज मी सामनात भाष्य केलंय. आम्हाला अपेक्षा होती की, ते न्याय करतील. कारण ते नेहमीच न्याय आणि सत्याची भाषा करतात. पण गुन्हेगारांना त्यांनी सांभाळून घेतलं आहे. वाल्मिक कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे. लहान मासे कापले आहेत आणि मोठे मासे सेफ आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना संरक्षण दिलं पाहिजे. पण हे मुख्य आरोपीला वाचवायला चालले आहेत. सरकार प्रोटेक्शन मनी घेतंय का? असा सवाल खासदार राऊत यांनी विचारलाय.
स्वबळावरून महाविकास आघाडीत वाद : दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीत लढवायच्या की स्वबळावर यावरून महाविकास आघाडीत वाद पाहायला मिळत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. यावर काँग्रेसमधून नाराजीचा सूर दिसला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मी कधीही म्हटलं नाही की मविआ फुटली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आम्ही एक भूमिका मांडत आहोत. पक्षप्रमुख सर्वांच्या भावना जाणून घेत आहेत. आघाडी विधानसभेसाठी होती. लोकसभेसाठी इंडिया आघाडी होती. भाजपासोबत असतानाही आम्ही एकटे लढलो. काँग्रेस नेत्यांनी आमचं विधान व्यवस्थित ऐकायला हवं होतं."
निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा आमची याबाबतची विधाने ऐकावीत. इंडिया आघाडी तुटली पाहिजे, असं आम्ही कधीही म्हटलं नाही. ते इतर लोक म्हणत असतील. पण महाविकास आघाडी फुटली पाहिजे, असं आमचं विधान नाही. विधानसभेसाठी महाविकास आघाडी एकत्र आली आणि अजूनही एकत्र आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी आहेत. कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय.
हेही वाचा -