पुणे: राज्यभरात बुधवारी मतदान पार पडलं. राज्यात जवळपास 65 टक्के मतदान झालं असून, पुणे जिल्ह्यात एकूण ६१.०५ टक्के मतदान झालं. पुणे शहर तसंच जिल्ह्यात अनेक मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला असून, हा वाढलेला टक्का कोणाचा? तसेच याचा नेमका फायदा कोणत्या पक्षाला होणार? पुणे शहर आणि जिल्ह्यात कोणत्या पक्षाची काय परिस्थिती असणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात काय परिस्थिती असणार? याबाबत पुणे शहरातील विविध वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांशी बातचीत केली आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...
बारामती दादांची? : "बारामतीत 2019 मध्ये अजित पवार हे खूप जास्त मतांनी निवडून आले होते. यावेळेसचं चित्र थोडं वेगळं असून, अजित पवारांचं मताधिक्य कमी होईल, पण ते निवडून येण्याची शक्यता जास्त आहे," असं मत एका ज्येष्ठ पत्रकारानं 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना मांडलं. "बारामतीत शरद पवार यांना असलेली सहानुभूती व अजित पवार यांनी केलेला विकास आणि जोडलेली नवीन पिढी यामुळं येथे काय निकाल येणार हे आता सांगणं कठीण आहे. बोलताना मतदार हे अजित पवार यांचं नाव घेत असले तरी शरद पवार यांच्याबाबतची भावनिक साद येथे पाहायला मिळण्याची शक्यता आहे," असंही मत काही पत्रकारांनी मांडलं. बारामतीत अजित पवार हे निवडून येण्याची शक्यता जास्त असल्याचा सूर सर्वच पत्रकारांचा पाहायला मिळाला.
पुणे शहरात महायुती वरचढ? : "पुणे शहरातील आठ मतदारसंघात जास्त मतदान झालं. यात महिलांचाही मोठा वाटा होता. आठ पैकी महायुतीला चार ते पाच जागा, तर महाविकास आघाडीला तीन ते चार जागा मिळू शकतील, असा अंदाज आहे. जिल्ह्यातही महायुतीचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अजित पवारांचे जास्त विद्यमान आमदार असून, याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही महायुतीला जास्त जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. तसंच महाविकास आघाडीही जिल्ह्यात चांगली टक्कर देण्याची शक्यता आहे, " असं मत पुण्यातील काही ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलं.