अमरावती Historical Mandleahvar Well : ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील अचलपुर इथं अकोलकर यांच्या शेतात मंडलेश्वराची अतिशय सुंदर विहीर आहे. पुरातन स्थापत्य कलेचा एक खास नमुना असणाऱ्या या विहिरी संदर्भात "ईटीव्ही भारत"चा स्पेशल रिपोर्ट.
कशी आहे विहीर : दुरुन चौकोनी आकाराची भासणारी विहीर जवळ जाऊन पाहिली तर काळा दगडांमध्ये एक छोटासा महालच जमिनीत बांधला की काय असं या विहिरीत डोकावताना वाटतं. पूर्णतः काळ्या दगडांमध्ये या विहिरीचं बांधकाम झालंय. विहिरीच्या आत दोन बाजूला घुमट आकाराची दोन दारं दिसतात. पहिल्या नजरेत या दोन्ही बाजूच्या दारांकडं पाहताना हे बांधकाम मुस्लिम स्थापत्य शैलीतलं असावं असं वाटतं. मात्र, या दारांच्या खाली दगडांमध्ये तोरणं कोरली आहेत. या तोरणांवरुन हे बांधकाम हिंदू राजाच्या काळातलं असावं हे स्पष्ट होतं. सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी या ठिकाणी इलीच राजाचं राज्य होतं. ही विहीर देखील साडेपाचशे वर्ष जुनी असावी, असं इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
विहीर नव्हे, जलविहार केंद्र : आज या ठिकाणाला विहीर असंच समजल्या जातं. मात्र साडेपाचशे वर्षांपूर्वी हे बांधकाम झालं त्यावेळी ते विहीर म्हणून नव्हे तर जलविहार केंद्र म्हणून बांधण्यात आलं. राजाच्या आंघोळीसाठी हे जलविहार केंद्र होतं. या ठिकाणी असणारं पाणी लगतच्या शेत शिवारात देखील वापरल्या जायचं असं या ठिकाणी पाहताना लक्षात येतं असं देखील इतिहासाचे अभ्यासक प्रा.डॉ.वैभव मस्के म्हणाले.
गाविलगडावरुन आणले दगड : या जलविहार केंद्रात ज्या पद्धतीनं दगडांची कापणी केलेली दिसते त्यावरुन हे सगळे दगड गाविलगड किल्ल्यावरुन आणले असावेत. गाविलगड किल्ल्यावर पूर्वी दगडांची खाण होती. अकबराच्या दरबारात असणाऱ्या नवरत्नांपैकी एक अबू फजल यानं लिहिलेलं आईने अकबरी नावाच्या पुस्तकात गाविलगड इथं दगडांची खाण आहे, असा उल्लेख केला आहे. याठिकाणी जलविहर केंद्रासाठी गाविलगडावरुनच दगड आणण्यात आले असावेत. या विहीरीच्या बाजूलाच अकबराच्या सैन्याचा सेनापती राजा मानसिंग याची समाधी देखील आहे. पुरातत्व विभागानं या ऐतिहासिक जलविहर केंद्राचं जतन व्हावं यासाठी प्रयत्न करावेत असंही प्रा. डॉ. वैभव मस्के म्हणाले.
मंडलेश्वर आणि मंडलशहा अशी दोन नावं : मंडलेश्वराच्या विहिरीतून महादेवाची प्राचीन पिंड सापडली. या विहिरीच्या पाण्यात बेलाचं पान टाकल्याबरोबरच ते बुडतं अशी माहिती विहीर ज्यांच्या शेतात आहे, त्या शेतीचे मालक अर्जुन अकोलकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली. या विहिरीपासून काही अंतरावर जमिनीत हनुमानाची मूर्ती सापडली. आज या विहिरीजवळच हनुमानाचं मंदिर उभारण्यात आलं असून त्या ठिकाणी जमिनीत सापडलेल्या हनुमानाच्या मूर्ती सोबत विहिरीत सापडलेली महादेवाची पिंड देखील ठेवण्यात आली आहे. मुस्लिम शासन काळात या मंडलेश्वराच्या विहिरीचं नाव मंडलशहा पडलं असं देखील अर्जुन अकोलकर यांनी सांगितलं.
हेही वाचा :