महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"विषारी सापाच्या तोंडून हिरवे फुत्कार केवळ मतांच्या लाचारीसाठी", प्रविण दरेकरांचा जितेंद्र आव्हाडांवर घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेला भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Etv Bharat
जितेंद्र आव्हाड, प्रविण दरेकर (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2024, 9:17 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पातळीच राहिलेली नाही. राज्यात सगळ्यात विकृत मानसिकतेचे राजकीय पुढारी जितेंद्र आव्हाड आहेत. निवडणुका जवळ आल्यात म्हणून या विषारी सापाच्या तोंडून हिरवे फुत्कार केवळ मतांच्या लाचारीसाठी येताहेत, अशा शब्दांत विधानपरिषदेतील भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेला दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आव्हाडांनी दरोडे टाकण्याचं काम केलं :"अजित पवारांवर टीका करणं, हे जितेंद्र आव्हाडांकडून जाणिवपूर्वक ठरवून केलं जात आहे. अजित पवारांना नामर्द म्हणणाऱ्या आव्हाडांनी अजित पवारांसमोर उभे राहून बोलावं, त्याचवेळी त्यांच्या देहबोलीतून नामर्द कोण आहे हे कळेल," असा टोला दरेकरांनी लगावला. गृहनिर्माण खात्याच्या मंत्रिपदी असताना आव्हाडांनी दरोडे टाकण्याचं काम केलं, ते आम्ही जनतेसमोर आणणार असा इशाराही दरेकरांनी दिलाय.

हेलिकॉप्टरनं एबी फॉर्म पाठवणं गुन्हा नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उमेदवारांना अखेरच्या क्षणी हेलिकॉप्टरनं एबी फॉर्म पाठवल्याबाबत दरेकर म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख म्हणून त्यांचं काम केलं आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग तपास करत आहे. त्याला शिवसेना उत्तर देईल."

जरांगे पाटील मराठा समाजासाठी काम करतात की मविआसाठी? :"मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी काम करत आहेत की शरद पवार, उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडीसाठी काम करत आहेत, हे लवकरच कळेल. त्यांचे उमेदवार निश्चित झाल्यावर ते मराठा समाजाच्या हितासाठी काम करतात की मविआसाठी काम करतात हे स्पष्ट होईल," असं दरेकर म्हणाले. "देवेंद्र फडणवीसांना तुमच्या नादी लागण्याइतका मोकळा वेळ नाही, त्यांच्याकडे खूप कामं आहेत. त्यांना राज्याचं नेतृत्व करायचं आहे. तुम्ही कुणासाठी बेजार होताय हे उमेदवार जाहीर झाल्यावर कळेल, असा टोला त्यांनी जरांगे यांना लगावला.

मोदींच्या सभेला राज ठाकरेंना निमंत्रण? :"लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळं त्यांच्या मुलाला आम्ही समर्थन देत असू तर तो सभ्यतेचा आणि संस्कृतीचा भाग महाराष्ट्राच्या राजकारणात ठरू शकेल," असं प्रविण दरेकर म्हणाले. 14 नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेला राज ठाकरेंना निमंत्रित करणार का, यावरही प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. मोदींच्या सभेला राज ठाकरेंना निमंत्रित करण्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते, महायुतीचे नेते निर्णय घेतील, असं दरेकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा

  1. बंडखोरीमुळं भाजपाची वाढली डोकेदुखी; अकोला पश्चिममध्ये बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न
  2. "महिलांना दरमहा 2100 रुपये, तर दोन मोफत गॅस सिलेंडर...", झारखंड निवडणुकीसाठी भाजपाचं 'संकल्प पत्र' जारी
  3. "राज ठाकरेंना भेटून त्यांचा आशीर्वाद...", नेमकं काय म्हणाले सदा सरवणकर? माहीमचा पेच सुटणार?

ABOUT THE AUTHOR

...view details