नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हायहोल्टेज मतदार संघ असलेल्या लोहा मतदारसंघात माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आशाताई शिंदे हे भाऊ- बहीण आमने सामने असणार आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघात 10 वर्षानंतर माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. आशा शिंदे या शेकापच्या विद्यमान आमदार असून त्यांनीही काल अर्ज दाखल केला आहे.
माझ्यासोबत हजारो बहिणी :"राजकीय संघर्ष माझ्या आयुष्यात कायम पुंजलेला आहे. त्यामुळंच मला पक्ष बदलावे लागत आहेत. मी पुढील निवडणुकीत राहील, अथवा न राहील, पण येथील जनतेनं मला नेहमीच आपल्या मनात जपलंय. पक्ष बदलला तरी जनतेची साथ नेहमीच राहिली. देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेलो ते केवळ जनतेमुळं. लोहा मतदारसंघ माझं कुटुंब आहे. जनतेच्या सुखदुःखात आम्ही नेहमीच सहभागी होतो. कोण काय बोलतं याकडे लक्ष देऊ नका. एक बहिण दूर झाली, तरी माझ्यासोबत हजारो बहिणी आहेत," अशी प्रतिक्रिया चिखलीकर यांनी दिली.
लोहा मतदारसंघात बहीण भाऊ आमने- सामने (Source - ETV Bharat Reporter) लाडक्या बहिणीला दगा दिला : प्रताप पाटील चिखलीकर यांनी शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल केल्यानंतर आशा शिंदे यांनी देखील शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केला. शेकाप पक्षाकडून त्यांनी अर्ज दाखल केला आहे. आशा शिंदे ह्या शेकापचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आणि चिखलीकर यांच्या बहिण आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर आशा शिंदे यांनी चिखलीकर यांच्यावर टीका केली. "लाडक्या बहिणीनं भावाला मोठं करण्यात आयुष्य घातलं, पण भावानं लाडक्या बहिणीला दगा दिला. माझ्या आई वडिलांनी चिखलीकराना सांगितलं होतं बहिण आणि दाजीसोबत बेईमान होऊ नको, पण ते बेईमान झाले," असं आशा शिंदे म्हणाल्या. दरम्यान येत्या काळात बहीण- भावामध्ये प्रचारादरम्यान कलगीतुरा पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा
- शरद पवारांचा पूर्व विदर्भावर फोकस; मात्र 'या' पक्षाला सन्मानजनक जागा पदरात पाडून घेण्यात अपयश
- माहीम मतदारसंघात भाजपाची भूमिका काय? अमित ठाकरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
- नांदेड लोकसभा निवडणुकीत माघार, आता जलील पूर्व मतदार संघातून मैदानात...