कोल्हापूर Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. यामुळं दोन्हीही मतदारसंघात महाविकासआघाडी आणि महायुतीकडून प्रचाराचं रानं उठवलं जातय. खास करून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज हे शिवछत्रपती आणि राजर्षी शाहूंच्या गादीचे वंशज असल्यामुळं प्रचारात गादीवरून सोशल मीडियावर सध्या अनेक पोस्ट आणि मिम्स व्हायरल केल्या जात आहेत. शनिवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर 'भीती गादीची म्हणून सभा मोदींची', या आशयाचे संदेश महाविकासआघाडीकडून पसरवले जात आहेत. तर 'मान गादीला मात्र मतं मोदींना' अशा पोस्ट महायुतीकडून व्हायरल केल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं गादी आणि मोदींवरुन कोल्हापुरात सध्या सोशल मीडियावर धुमशान सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतय.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2019 साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात 'मान गादीला मात्र मत मोदींना' या टॅगलाईन खाली प्रचार करण्यात आला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात सातारा लोकसभेचा कित्ता गिरवला जात आहे. महायुतीकडून 'मान गादीला मात्र मतं मोदींना' या आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत, तर महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 'भीती गादीची म्हणून सभा मोदींची' या आशयाचे हॅशटॅग व्हायरल केले जात आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा कोल्हापूरची गादी केंद्रस्थानी आली असून 7 मे रोजी होणाऱ्या मतदानात कोल्हापूरकर कोणाच्या पारड्यात मताचं दान टाकतात? यावरूनच 'गादी की मोदी' याचा निकाल स्पष्ट होणार आहे.