महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात 18 सभा घेऊनही महायुतीचे 'हे' उमेदवार पराभूत, जाणून घ्या कारण - Maharashtra Lok Sabha results

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी '400 पार'चा नारा देत महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जर मिळाल्या तर अधिक मजबूती येईल, कारण अन्य राज्यांमध्ये परिस्थिती फारशी पोषक नाही. असे वाटत असल्याने महाराष्ट्रावर नजर ठेवून त्यांनी महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या. मात्र त्यांनी सभा घेतलेल्या 23 उमेदवारांपैकी 18 उमेदवार पराभूत झाले आहेत.

PM Modi 18 public meeting
PM Modi 18 public meeting (Source- ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 1:35 PM IST

Updated : Jun 5, 2024, 1:51 PM IST

मुंबई- राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीला जनतेने नाकारत केवळ 17 जागांवर उमदेवारांना विजयी केलं आहे. भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष होता. मात्र तो आता तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

महाराष्ट्रात महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळाल्या तर केंद्रात एनडीए सरकारल अधिक मजबूती येईल, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभांवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. पहिल्या दोन टप्प्यात महाराष्ट्रात महायुतीला पोषक वातावरण नाही, हे लक्षात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिक सभा घेण्याचा निर्णय भाजपाच्या नेत्यांनी घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील 23 उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 18 सभा घेण्यात आल्या. मात्र असं असतानाही त्याचा फारसा फायदा झाला नाही. महाराष्ट्रातील एकूणच भाजपाची रणनीती चुकल्याचे बोलले जात आहे. या अपयशाचे धनी आता चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह शीर्षस्थ नेतृत्वाला मानले जात आहे.

प्रचारातील मुद्दे रुचले नाहीत -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आपली प्रचारातील रणनीती बदलण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत पंतप्रधानांनी विकासाच्या मुद्द्यावर कुठेही भर दिला नाही. महाराष्ट्रात फिरताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही 'नकली शिवसेना' असल्याचं वक्तव्य केलं. इतकंच काय उद्धव ठाकरे यांना त्यांनी 'नकली संतान' म्हणून आंध्रप्रदेशमधील सभेत संबोधले. महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेला अशा पद्धतीचा उल्लेख रुचणे शक्य नव्हते. त्याचसोबत पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा 'भटकती आत्मा' म्हणून केलेला उल्लेख ही महाराष्ट्रातील जनतेला खटकला. म्हणूनच त्यांनी पुण्यातील सभा घेऊनही बारामतीवर त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. पुन्हा एकदा त्यांनी भारत-पाकिस्तान हा मुद्दा काढला. पंतप्रधानांनी मंगळसूत्राचा मुद्दा काढून महिलांच्या भावना दुखावल्या. एकूणच लोकप्रिय किंवा सवंग विधाने करून मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधानांकडून झालेली विधाने ही उलट भाजपाच्या आणि एनडीएच्या विरोधात जाणारी ठरली.



या ठिकाणी झाल्या पंतप्रधानांच्या सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 23 उमेदवारांसाठी सभा झाल्या होत्या. या उमेदवारांपैकी केवळ पाच उमेदवार निवडून आले. तर 18 उमेदवार पराभूत झाले आहेत.

  1. रामटेक येथील शिंदे गटाचे राजू पारवे पराभूत झाले आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या श्याम कुमार बर्वे यांनी बाजी मारली आहे.
  2. चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार या भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसच्या प्रतिभा धानोलकर विजयी झाल्या आहेत.
  3. वर्धा येथे रामदास तडस हे भाजपाचे उमेदवार पराभूत झाले. तर अमर काळे यांनी विजय संपादन केला.
  4. पंतप्रधानांची सभा झालेल्या परभणी येथे महादेव जानकर यांचा पराभव झाला. या ठिकाणी ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी झाले.
  5. नांदेड येथे प्रतापराव चिखलीकर या भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले.
  6. कोल्हापूर येथे झालेल्या सभेनंतरही संजय मंडलिक हे शिंदे गडाचे उमेदवार पराभूत झाले. काँग्रेसच्या शाहू महाराज यांनी विजय मिळवला.
  7. सोलापूर येथे मात्र भाजपाच्या राम सातपुते यांना पराभवाची चव चाखावी लागली आणि प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या विजयी झाल्या.
  8. बीड येथे पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांनी निसटता विजय मिळवला आहे.
  9. धाराशिव येथे भाजपाच्या अर्चना पाटील पराभूत झाल्या. तर ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांनी मोठ्या फरकानं विजय मिळविला.
  10. बारामती या अत्यंत अटीतटीच्या लढतीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना विजय मिळाला. तर अजित पवार गटाच्या सुमित्रा पवार पराभूत झाल्या. पुण्यात ठिकाणी पंतप्रधानांनी संयुक्त सभा घेतल्या होत्या.
  11. लातूर येथे भाजपाचे सुधाकर शृंगारे पराभूत झाले. काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी झाले.
  12. नगर येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर्चस्व असलेल्या मतदारसंघात सुजय विखे पाटील यांचा पराजय करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी बाजी मारली.
  13. नंदुरबार येथे हिना गावित या भाजपाच्या उमेदवार पराभूत झाल्या. तर काँग्रेसच्या गोवा पाडवी यांनी विजय मिळवला.
  14. दिंडोरी येथे भारती पवार या भाजपाच्या माजी मंत्री पराभूत झाल्या. या ठिकाणी भाग शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी बाजी मारली.

याठिकाणी मिळाला विजय

  1. कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे या शिंदे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवला. त्यांनी वैशाली दरेकर या ठाकरे गटाच्या उमेदवाराला पराभूत केले.
  2. सातारा येथे भाजपाला यश आले असून उदयनराजे भोसले विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे पराभूत झाले.
  3. पुणे येथे मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत झाले.
  4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत घेतलेल्या महासभेनंतर मुंबईतील सहा उमेदवारांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले. मुंबईत केवळ दोन जागांवर महायुतीला विजय मिळवता आला आहे. भारतीय जनता पक्षाची रणनीती आणि मुद्दे यावेळी सपशेल चुकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुंबईत याठिकाणी विजय

  • मुंबई उत्तर -भाजपाचे पियुष गोयल (भाजप) विजयी - काँग्रेसचे भूषण पाटील पराभूत
  • मुंबई उत्तर पश्चिम - शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी – ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पराभूत

मुंबईत याठिकाणी पराभव

  • मुंबई उत्तर मध्य – भाजपाचे उज्ज्वल निकम पराभूत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी
  • मुंबई दक्षिण मध्य - शिंदे गटाचे राहुल शेवाळे पराभूत – शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी
  • मुंबई दक्षिण - शिंदे गटाच्या यामिनी जाधव पराभूत, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी
  • मुंबई उत्तर पूर्व –भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत – शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विजयी

हेही वाचा-

  1. लोकांच्या मनात पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी; आजच्या बैठकीत सरकार स्थापनेच्या दाव्याबाबत रणनीती ठरवणार : शरद पवारांचा मोठा दावा - Sharad Pawar Press Conference
  2. 'सत्तासोपान' गाठण्याकरिता इंडिया आघाडीसह एनडीए नेत्यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, जाणून घ्या संसदेमधील पक्षनिहाय बलाबल - INDIA Bloc Vs NDA
Last Updated : Jun 5, 2024, 1:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details