मुंबई Narayan Rane News - केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही नेमकी कुठल्या कारणासाठी झाली, याचा तपशील समजू शकला नाही. मात्र, राज्यसभेतून नारायण राणे यांचा पत्ता पक्षानं कापण्यात आलाय. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक लढवावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
एकनाथ शिंदे गटाचं लागणार सहकार्य-राज्यसभेतून बाहेर झाल्यानंतर लोकसभेबाबत प्रश्नचिन्ह- कोकणात नारायण राणे यांचा दबदबा मानला जातो. परंतु कोकणात शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे. अशात आता शिवसेनेचे दोन गट झाल्यानं कोकणी माणूस दोन गटात विखुरला गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नारायण राणे यांना रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढावी लागण्याची शक्यता आहे. जर भाजपानं त्यांना निवडणूक लढवण्यास भाग पाडले तर त्यांना शिंदे गटाचे समर्थनसुद्धा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. याच कारणानं नारायण राणे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये जागा जिंकायची-रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडं असून विनायक राऊत हे येथील खासदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून नारायण राणे यांना निवडणूक लढविण्याचा आदेश पक्षानं दिल्यास नारायण राणे यांना विजयासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची ताकद मोठ्या प्रमाणात लागणार आहे. याच कारणासाठी कशा पद्धतीनं रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात रणनीती आखता येईल? या दृष्टीनं ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली ही जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला जिंकायची आहे. त्यामुळे राजकीय गणितं काय असू शकतात या संदर्भात सुद्धा राणे - शिंदे यांच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे.