सातारा : महायुती सरकारमध्ये सातारा जिल्ह्याला चार-चार मंत्रिपदं मिळाली आहेत. एकेकाळी खासदारांसह विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा निवडून देत होतो, पण एकही मंत्रिपद मिळत नव्हतं, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला. दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले नसते तर काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, असंही ते म्हणाले.
अभयसिंहराजेंना डावलल्यानं जिल्ह्याचं नुकसान : सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कराडमध्ये दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर येऊन अभिवादन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, काँग्रेसमध्ये त्याकाळी अभयसिंहराजे आणि विलासराव देशमुख हे दोघेच सिनिअर होते. त्यातही अभयसिंहराजे एक टर्म देशमुखांना सिनिअर होते. त्यामुळं काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, परंतु, राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना बाजूला का ठेवलं? काय राजकारण झालं? हा विषय वेगळा आहे. त्यांना पद न दिल्यानं त्यांच्या नेतृत्वाचं आणि जिल्ह्याचंही मोठं नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
उदयनराजेंशी माझं वैयक्तिक भांडण नाही : साताऱ्यातील स्थानिक राजकीय संघर्षाबद्दल बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, उदयनराजे आणि माझं काही वैयक्तिक भांडण नाही. परंतु, नगरपालिका निवडणुकीत एकाच वॉर्डातील माझा आणि त्यांचा कार्यकर्ता इच्छूक असतो. नेत्यासाठी काम करणाऱ्या, कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणुकीत संधी मिळावी, असं प्रत्येक नेत्याला वाटत असतं. त्यातून स्थानिक पातळीवर संघर्ष होत असतो. आम्हाला त्यातून काही मजा वाटत नाही.
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपाचाच करणार : आम्ही महायुतीत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी पक्ष श्रेष्ठींच्या सूचनेनुसार निवडणुकीची दिशा ठरवू, असं शिवेंद्रराजेंनी सांगितलं. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपाचा झाला पाहिजे, असं भाजपा कार्यकर्त्यांचं ठाम मत आहे. त्यानुसार झेडपीचा अध्यक्ष हा भाजपाचा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
रामराजेंचा पक्ष कोणता, हे त्यांनाच माहीत नाही : महायुतीत राष्ट्रवादी हा मित्रपक्ष असल्यानं रामराजेंसोबतचा संघर्ष संपणार का? या प्रश्नावर मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, माझा संघर्ष मी संपवलेला आहे. कारण, त्यांच्या संघर्षात ताण आणि शक्ती उरलेली नाही. रामराजे कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांनाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. जिल्ह्याच्या परंपरेनुसार सर्वांना सोबत घेऊन राजकारण करणार आहे. रामराजे म्हणजे फलटण नाही. मी फलटणच्या जनतेसोबत आहे, असा टोलाही त्यांनी नाव न घेता रामराजेंना लगावला.
हेही वाचा -