जळगाव : शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवजड वाहतुकीमुळं होणारे अपघात पाहता नुकतीच नियमावली जारी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अपघातांचं सत्र थांबलेलं नाही. शहरातील कालिकामाता चौकात भरधाव डंपरनं धडक दिल्यानं नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तर बालकासोबतचे दोघेही जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे.
बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी : जेवणाचं पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय भाच्याचा मृत्यू झाला आहे. सोबत असलेली त्याची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले असून थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान या घटनेमुळं शहरातील संतप्त नागरिकांनी उभा डंपर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. योजस धीरज बहाटे (9, रा.लीला पार्क, अयोध्या नगर) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.
काय घडलं नेमकं? : योजस हा चिमुकला आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बहाटे (13) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्यास होता. बुधवार, 25 डिसेंबर रोजी भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचं पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे 7.15 वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिका माता चौकातून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजस बहाटे हा चिमुकला जागीच ठार झाला तर बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला होता. त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसंच अग्निशमन दलाला देखील बोलवण्यात आलं आणि ही आग विझवण्यात आली.
हेही वाचा -