ठाणे : ठाणे महानगरपालिका प्रशासन ठाणेकरांकडून कराच्या रुपात घेणाऱ्या पैशांच्या बदल्यात शहरातील विकास आणि ठाणेकरांच्या मूलभूत सुविधा पुरवण्याची आणि आरोग्याचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतं. मात्र ठाणे पालिका प्रशासनानं आता सेल्फ सर्व्हिसचा अजेंडा सुरु केला की काय असं वाटत आहे. ठाण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तपासणीत डास आढळल्यास सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवावर कायदेशीर कारवाईचे संकेत पालिका प्रशासनानं दिल्यानं आता गृहनिर्माण सोसायट्यांना मात्र डास प्रतिबंधक फवारणी स्वतः करावी लागणार असल्याचं दिसत आहे.
ठाणे महापालिकेनं ठाणे शहरातील उच्चभू गृहनिर्माण सोसायट्यांना आता नोटीस पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. पालिकेच्या या नोटीसमध्ये डास उत्पन्न होणाऱ्या गोष्टींना टाळावे, पालिकेद्वारे गृहनिर्माण सोसायटीची तपासणी करण्यात येणार आहे. यात डास असल्याचं समोर आल्यास कारवाईचे संकेतही देण्यात आल्यानं सर्वसामान्य सोसायटीच्या सदस्यांमध्ये खळबळ उडालेली आहे.
यामुळे वाढतात डास - सदनिकांच्या गॅलरीतील मोकळ्या जागा, झाडांच्या कुंड्या इतर अडगळ साहित्य यात पावसाचं किंवा अन्य प्रकारे पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. इमारतीच्या आवारात, टेरेसवर, स्टोअर रुममध्ये, तसंच इतरत्र साचलेलं रिकामं साहित्य, गाड्यांचे टायर्स, भंगार साहित्य अशा ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे इमारतीच्या परिसरात आणि इमारतीत डासांचा निर्मिती होणार नाही, याची दक्षता घेणं ही सर्वस्वी संबंधीत सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटीचे अध्यक्ष तसंच सचिव यांची जबाबदारी असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे.
५० सदनिकांच्या सोसायट्यांनी पेस्ट कंट्रोल एजन्सी नियुक्त करावी - ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये कमिटीनं स्वतंत्र पेस्ट कंट्रोल एजन्सी नियुक्ती करून डास प्रतिबंधक उपाय योजना करुन डास उत्पत्ती नियंत्रित करावी. तसंच या संदर्भात सोसायटीधारकांची बैठक घेऊन त्यांना याबाबतीत जनजागृती करण्याचं आवाहन पालिकेच्या नोटीसद्वारे करण्यात आलेलं आहे. तसंच सोसायटीची बैठक घेऊन सदस्यांना मार्गदर्शन आणि धोकादायक गोष्टी टाळाव्या याची माहिती द्यावी असं पालिकेनं नोटीसद्वारे कळवलं. नोटीस दिल्यापासून ७ दिवसात आवश्यक ती कार्यवाही करावी आणि आवाहल पालिकेच्या मेल आयडीवर पाठवण्यास सांगितलं आहे.
नागरिकांचा नकारात्मक सूर - ठाणेकरांच्या आरोग्याचं रक्षण करणारी पालिका आणि मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी घेतलेल्या पालिकेनं सोसायट्यांच्या खांद्यावर डास प्रतिबंधक फवारणीची जबाबदारी टाकणे कितपत योग्य आहे असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. तर काहीजण, पालिका केवळ मालमत्ता आणि विविध कर वसुली पुरतीच आहे काय? असा प्रश्नही उपस्थित करीत आहेत.
हेही वाचा...