महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

गडकरींविरोधात मोदी, शाह आणि फडणवीसांचा कट; राऊतांच्या आरोपावर काय म्हणाले महायुतीतील नेते? - Sanjay Raut News - SANJAY RAUT NEWS

Nagpur lok sabha election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून भाजपाच्या राजकारणावर भाष्य केलंय. नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. यावरच आता महायुतीतील नेत्यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

BJP Leaders reaction on Sanjay Raut statement about Nitin Gadkari Devendra Fadnavis lok sabha election 2024
संजय राऊत नितीन गडकरी अमित शाह देवेंद्र फडणवीस (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 2:02 PM IST

मुंबई Nagpur lok sabha election 2024:4 जूननंतर भाजपात मोदी-शाह यांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरींचा नागपूरात पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून केला. त्यावर भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं.



खोटं बोलण्याचं व्यसन जडलंय : खासदार राऊतांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "नितीन गडकरी हे मोठे आणि देशव्यापी नेते आहेत. संसदेत त्यांच्या कामाबद्दल विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांचं कौतुक केलंय. गडकरींनी देशात मोठमोठे ब्रिज उभारलेत. तसेच पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सहकार्यामुळं आणि पाठिंब्यामुळंच ते करू शकले. त्यामुळं गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह प्रयत्न का करतील? त्यांना रोज उठून काहीतरी बोलण्याची सवय लागली. पेपरमध्ये आपली बातमी यावी, यासाठी खोटं बोलण्याचं त्यांना व्यसन जडलंय." तसंच राऊतांच्या या आरोपात बिल्कुल तथ्य नसल्याचंही सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.

केविलवाणा प्रयत्न : "नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी प्रयत्न करणाऱ्याच्या आरोपात काहीच तथ्य नाही. असं झालं असेल असं मला अजिबात वाटत नाही," असं शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय. पुढे शिरसाट म्हणाले, " नितीन गडकरी यांचा पराभव होणं शक्य नाही. त्यांनी देशात अनेक मोठी कामं केलीत. परंतु, संजय राऊत यांना महायुतीत किंवा भाजपा पक्षात काहीतरी बेबनाव आहे, असं दाखवायचं. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. तसंच अजित पवार यांचे उमेदवार पाडण्याचा संजय राऊत यांनी केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. महायुतीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी समन्वयानं काम केलंय. तिघांनीही महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी काम केलंय. त्यामुळं महायुतीत निश्चितच आलबेल आहे," असंही संजय शिरसाठ यावेळी म्हणाले.

संजय राऊत भ्रमिष्ट अवस्थेत :“उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलंय. राऊत हे उद्धव ठाकरेंचे कर्मचारी आहेत. पण ते शरद पवारांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजपा हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार? आदरणीय मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवारनंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळं राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडले असेल. 2019 मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव अयशस्वी झाला. हिंमत असेल तर एक ‘रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या!”, अशी जोरदार टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांवर केलीय.

हेही वाचा -

  1. "भाजपाला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मान्य होतं पण,..."; संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यानंतर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट - Sanjay Shirsat
  2. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपासह अजित पवारांचा होता विरोध, संजय राऊत यांनी 'हे' सांगितलं कारण - Sanjay Raut news
  3. मोदी यांना 'दंश करणारा साप' म्हणत संजय राऊतांचा 'जहरी' हल्लाबोल; राजकीय वातावरण तापणार? - Sanjay Raut

ABOUT THE AUTHOR

...view details