ठाणे - बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री आज सायंकाळच्या सुमारास भिवंडीतील मानकोली नाका येथे इंडियन ऑयल कंपनीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भक्तांना भभूती देणार असल्याचं सांगितलं. त्यांनी आधी महिलांना, त्यानंतर पुरुषांना एका रांगेत येण्याचं आवाहन केलं. मात्र, काही वेळातच गर्दीचा ताण वाढत गेला आणि भभूतीसाठी व्यासपीठावर चढण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. यामुळं गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ही भाविकांची गर्दी आवरताना पोलिसांची दमछाक झाली होती.
बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग - मुबंई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. शास्त्रींनी कथाकथनामधून भक्तांना प्रवचन दिलं आणि नंतर भभूती वाटपाची घोषणा केली. यासाठी महिलांनी प्रथम रांग लावली, त्यानंतर पुरुषांनी. पण गर्दी एवढी वाढली की नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. भभूतीसाठी भाविक आक्रमक झाले आणि एकमेकांवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओमध्ये दिसतं की, गर्दीचा ताण वाढल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला. तर काही महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं त्यांना बाजूला नेण्यात आलं.
धीरेंद्र शास्त्री निघून गेले - यानंतर, धीरेंद्र शास्त्री, परिस्थिती गंभीर होत असल्याचं पाहून व्यासपीठावरून निघून गेले. त्यानंतरही भाविक व्यासपीठावर जाण्यासाठी धावले. ज्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान मुबंई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथील इंडियन ऑयल कंपनीच्या परिसरात मंदिर उभारणीचं काम सुरू आहे. गेल्या दोन वर्षात बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री या ठिकाणी प्रवचन देण्यासाठी चार ते पाच वेळा आले आहेत. आज मात्र अशी घटना घडल्याने यापुढे सुरक्षा अधिक वाढवण्याची खबरदारी आयोजकांनी घ्यावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.