पुणे- काल दिल्लीतील एका सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय. यावरून आता महाविकास आघाडीत जुंपली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार टीका सुरू झालीय. आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवारांवर संताप व्यक्त केलाय, तर राऊत यांच्या टीकेला उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राऊत यांनी केलेली टीका हास्यास्पद असल्याचं म्हटलंय.
संजय राऊत यांनी त्यांच्या कृतीत बदल करावा- जगताप : यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, मागच्या 25 वर्षांत संजय राऊत हे जर राज्यसभेचे खासदार असूनसुद्धा जर त्यांना राजकारणाची व्यापक दृष्टी नसेल तर सगळाच पोरखेळ आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एक महिन्यात तीन तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, तेव्हा आम्ही शंका घेत नाही. पण दिल्लीत साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात पवार साहेबांकडून जर उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार होत असेल तर त्यावर टीका करणे योग्य नाही. संजय राऊत यांनी त्यांच्या कृतीत बदल करावा, असंही यावेळी जगताप म्हणालेत.
शिंदेंसारखे आंतरराष्ट्रीय दलाल पवार साहेबांसोबत- राऊत : काल दिल्लीतील एका सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यावरून आता महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी आपली नाराजी आज उघडपणे व्यक्त केलीय. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. खासदार संजय राऊत म्हणाले होते की, " शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शाहांचाच सत्कार केलाय. गद्दारांना असे सन्मान देणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे. पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होतं. राज्याचं राजकारण विचित्र दिशेनं चाललं आहे. ठाण्याचा विकास हा शिवसेनेनं केला. शरद पवारांना ठाण्याबाबत चुकीची माहिती आहे. पवारांबाबत आम्ही आमच्या पक्षाच्या भावना मांडल्या आहेत. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली सुरू आहे. आता शिंदेंसारखे आंतरराष्ट्रीय दलाल पवार साहेबांसोबत आहेत," असंही संजय राऊत म्हणालेत.
हेही वाचा-