मुंबई- गडचिरोलीच्या विकासाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करत असल्याचं पाहून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांचं कौतुक केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने ( Shivsena UBT praises CM) उधळण्यात आली आहेत. तर नाव न घेता गडचिरोली माजी पालकमंत्री नुसतेच फेरफटका मारणारे होते, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
संपूर्ण देश नववर्षाच्या जल्लोषात मग्न असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत होते. मुख्य प्रवाहात परतण्यासाठी जहाल असणाऱ्या 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. त्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेनं (यूबीटी) त्यांचं भरभरून कौतुक केलं.
फडणवीसांकडून गडचिरोलीत विकासाचे पर्व- शिवसेनेच्या मुखपत्रात मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत असताना मंत्रिपदासाठी अडून राहिलेल्या नेत्यांवर टीकादेखील केली. शिवसेनेनं (यूबीटी) मुखपत्रात म्हटलं," नक्षलवाद्यांच्या जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीला 'पोलाद सिटी' ही नवीन ओळख मिळवून देणार असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वागत करायला हवे. नवीन वर्षाच्या सूर्योदपासून गडचिरोलीच्या परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचं राज्य असेल तर मुख्यमंत्री फडणवीस हे कौतुकाला पात्र आहेत. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खात्याचे मंत्रिपद आणि विशिष्ट खात्याचे पालकमंत्रिपद मिळण्यासाठी अडून बसले. पण, फडणवीस यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यात जाऊन विकासाचं नवे पर्व सुरू केले".
दोन आघाड्या कसोशीनं सांभाळाव्या लागणार- पुढे शिवसेनेच्या (यूबीटी) मुखपत्रात म्हटलं, "मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन केलं. गडचिरोलीत राजकीय इच्छाशक्ती दाखविली ही आनंदाची गोष्ट आहे. नक्षलवाद हा भारतीय समाजाला लागलेला डाग आहे. नक्षलवादामुळे गडचिरोलीसारखे अनेक भाग विकासापासून वंचित राहिल्यानं नक्षलवादी चळवळ फोफावली. नक्षलवाद्यांचा विरोध मोडून काढणे आणि विकासकामांची पूर्तता करणे या दोन आघाड्या कसोशीनं सांभाळाव्या लागणार आहेत. जहाल महिला नक्षलवादी ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत समर्पण केले. तसेच 77 वर्षांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अहेरी ते गर्देवाडा एसटी बस धावली".
नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका- "गडचिरोलीच्या या आधीच्या पालकमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे) मोटारसायकल वगैरे फेरफटका मारले. पण, आदिवासींच्या विकासापेक्षा ठरावीक खाणसम्राटांचे टक्के वाढविण्यासाठी होते, " असा शिवसेनेनं (यूबीटी) आरोप केला आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी रोडमॅप प्रत्यक्षात आणावा लागेल. नक्षलवाद नष्ट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उचललेलं पाऊल कौतुकास्पद आहे. गडचिरोलीत आधीचे पालकमंत्री खंडणी गोळा करायचे. आधी गडचिरोलीत पांडव नेमले होते. ते कौरवाचे काम करत होते, अशी टीका शिवसेनेकडून (यूबीटी) करण्यात आली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले आभार- सामनातील अग्रलेखातून भाजपासह ज्येष्ठ नेत्यांवर नेहमीच टीका केली जात असताना आज कौतुक झाल्यानं भाजपाच्या नेत्यांना सुखद धक्का बसला आहे. भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेच्या (यूबीटी) मुखपत्रातील अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना सामनाचे आभार मानले आहेत. "सामना कधी कौतुक करणार, या दिवसाची वाट पाहत होतो. हा फक्त ट्रेलर असून पिक्चर बाकी आहे", असे मंत्री बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-