मुंबई : वर्ष 2025 आता सुरू झालं आहे. 'स्काय फोर्स' हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अक्षय कुमार, वीर पहारिया आणि सारा अली खान स्टारर 'स्काय फोर्स'चा ट्रेलर अखेर 5 जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. भारताच्या पहिल्या हवाई हल्ल्यावर आधारित असलेल्या 'स्काय फोर्स' चित्रपटात जबरदस्त दमदार संवादसह ॲक्शन देखील चाहत्यांना पाहायला मिळेल. 1965 मध्ये भारतीय आणि पाकिस्तानी हवाई दलांमध्ये थेट संघर्ष झाला होता, यावर हा चित्रपट आधारित आहे. 6 सप्टेंबर रोजी पाकिस्ताननं पठाणकोट आणि हलवारा एअरबेसवर हल्ला केला होता. यानंतर भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला होता.
वीर पहारियाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण : या हल्ल्यामध्ये भारतीय वैमानिकांनी पाकिस्तानच्या सर्वात सुरक्षित एअरबेसचे मोठे नुकसान केले होते. या युद्धात शहिद झालेल्या वैमानिकाला भारतीय हवाई दलानं मरणोत्तर महावीर चक्र प्रदान केले होते. दरम्यान 'स्काय फोर्स' चित्रपटातून वीर पहारिया चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार आहे. या चित्रपटात तो स्क्वॉड्रन लीडर अजमादा बोप्पाया देवय्याची भूमिका साकारत आहे. स्क्वॉड्रन लीडर अज्जामद बोपय्या देवय्या हे रणांगणात आपल्या संघातील साथीदारांचे प्राण वाचविताना शहिद झाले होते. त्यांना मरणोत्तर महावीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं होतं.
'स्काय फोर्स'ची रिलीज डेट : या चित्रपटात सारा अली खान वीरच्या ऑन-स्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. दरम्यान यूजर्स ट्रेलरला खूप पसंत करत आहेत. सोशल मीडियावर प्रत्येकजण ट्रेलरवर आपल्या प्रतिक्रिया देत असून, या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. तसेच ट्रेलर रिलीज करताना अक्षय कुमारनं पोस्टच्या कॅप्शन लिहिलं, 'या प्रजासत्ताक दिनी, भारताच्या पहिल्या आणि सर्वात प्राणघातक हवाई हल्ल्याची कहाणी, एका वीर बलिदानाची कहाणी पाहा. मिशन 'स्काय फोर्स' 24 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.' संदीप केवलानी आणि अभिषेक कपूर दिग्दर्शित 'स्काय फोर्स' चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन, अमर कौशिक आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे.
हेही वाचा :