सोलापूर - प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली. शहरातील पोलिसांनी तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य १० ते १२ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला.
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियननं प्रणित मोरेनं सोलापूरमधील कार्यक्रमात वीर पहारियाची खिल्ली उडवली होती. "हा राजकीय नेत्याचा नातू असल्यानं त्याचा सोशल मीडियात पीआर सुरू आहे. मात्र, त्याचा अभिनय चांगला नाही, अशी अप्रत्यक्ष टीका प्रणित मोरेनं केली होती. त्यानंतर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियननं सोशल मीडिया अकाउंटवरून सोलापुरात मारहाण झाल्याचा दावा केला. त्यानंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यावर अभिनेता वीर पहारियानं हल्ल्याचा निषेध करत त्यात आपला कोणताही सहभाग नाही, असं स्पष्ट केलं होतं. तसंच दिलगिरीही व्यक्त केली होती.
सोशल मीडियात केली होती पोस्ट - प्रणित मोरे यानं 2 फेब्रुवारी रोजी सोलापूरमधील एका कार्यक्रमात स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहारियावर विनोद केला होता. त्याचा राग मनात धरून सोलापूरमधील वीर पहारियाच्या कथित समर्थकांनी प्रणित मोरेला मारहाण केली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर फोटोसेशन सुरू असताना दहा ते बारा जणांच्या गटानं हल्ला केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली होती. पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याची माहितीही प्रणित मोरेनं आपल्या पोस्टमधून दिली होती.
प्रणित मोरेनं दिला नाही जबाब - नंतर पोलिसांनी दखल घेत 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांत दहा-बारा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोलापूर शहर पोलिसांनी चौकशीबाबत प्रणित मोरेला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. मात्र, त्यानं अद्याप जबाब दिला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू अभिनेता वीर पहारिया यावर अप्रत्यक्षपणे स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यानं सोलापुरात एका कार्यक्रमात विनोद केला होता. त्यामुळे कार्यक्रमात उपस्थित असलेला एक गट नाराज झाला. त्यातून मारहाणीचा प्रकार घडला.