महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचे पारडे जड, भाजपा-महायुतीला जोर का झटका, पाहा महत्वाचे निकाल - Lok Sabha Election results 2024

MVA GAINED IN MAHARASHTRA THAN NDA - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपा आघाडीनं ४० पार चा नारा दिला होता. मात्र तो हवेतच विरल्याचं प्रत्यक्ष निकालात दिसून आलं. तर महाविकास आघाडीनं चांगलीच मुसंडी मारली. राज्यात असली आणि नकली शिवसेना यांच्यातही लढत होती. त्यामध्येही ठाकरे गट सरस ठरल्याचं निकालावरुन दिसून येतं. दुसरीकडे शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन अजित पवार यांनी सवता सुभाच मांडला नाही तर संस्थापक अध्यक्ष शरद पवार हयात असताना पक्षही त्यांच्या नावावर करुन घेतला. मात्र त्याचा अजित पवार यांना अजिबात उपयोग झाला नसल्याचं निकालावरुन स्पष्ट झालं. वाचा राज्यातील लोकसभा निकालाचा लेखाजोखा...

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचे पारडे जड
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचे पारडे जड (ETV Bharat, GFX Team)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 10:59 PM IST

Updated : Jun 5, 2024, 7:14 AM IST

मुंबई MVA GAINED IN MAHARASHTRA THAN NDA - महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली निवडणूक म्हणजे बारामतीची निवडणूक. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. त्यांची लढत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाशी होती. या मतदारसंघात शरद पवार तसंच अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात शरद पवार यशस्वी झाले आहेत.

राज्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेतली होती. त्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांचा पराभव केला. अजित पवार गटाचे ते एकमेव विजयी उमेदवार आहेत. अजित पवार गटाचे इतर सर्व उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले.

  • नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयी झालेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांचा पराभव केला. यापूर्वी दोनवेळा गडकरी यांनी नागपूर मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे.
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीयमंत्री भाजपाचे नेते नारायण राणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा यांचा पराभव केला.
  • बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला. या ठिकाणी फेर मतमोजणी घेण्यात आली. मात्र या मतमोजणीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.
  • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातही बीडप्रमाणेच मोठा फेरबदल झाल्याचं दिसून आलं. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघा फेरमतमोजणी करण्यात आली. यामध्ये शिंदे गटाचे रविंद्र वायकर विजयी झाले आहेत. केवळ 48 मतांनी फेरमतमोजणीत रवींद्र वायकर यांचा विजय झाला. या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला आहे.
  • रावेर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे विजयी झाल्या आहेत. भाजपानं सलग तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा पराभव केला. रक्षा खडसे या भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत.
  • महाराष्ट्रातील निकालाचा विचार करता, शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे -यूबीटी) विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे शिवसेना गटाचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला.
  • सांगली मतदारसंघात अपेक्षेप्रमाणं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (अपक्ष) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्घधव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील तसंच भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांचा पराभव केला.
  • नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या हिना गावित यांचा पराभव केला. हिना गावित या तिथल्या विद्यमान खासदार होत्या.
  • मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी झाले आहेत. या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना अनिल देसाई यांनी पराभव केला.
  • मुंबई दक्षिण मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला. अरविंद सावंत यांनी या ठिकाणी हॅटट्रिक केली आहे.
  • मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा पराभव केला.
  • जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं उद्ध ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार करण पवार पराभूत झाले आहेत.
  • कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव केला.
  • अकोला मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या डॉ अभय पाटील यांचा पराभव केला. उल्लेखनिय बाब म्हणजे याच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर उमेदवार होते. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
  • उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. त्यांनी नुकतेच भाजपामध्ये आलेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. निकम यांनी कसाबला फाशीची शिक्षा देण्यात वकील म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती
  • मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव केला.
  • बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा पराभव केला. प्रतापराव जाधव यांचा या मतदारसंघातून सलग चौथा विजय आहे
  • धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे. माजी संरक्षण राज्यमंत्री विद्यमान खासदार भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा त्यांनी पराभव केला.
  • लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगे यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर श्रुंगारे यांचा पराभव केला आहे
  • मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बरणे यांचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे संजोय वाघेरे यांचा पराभव केला.
  • नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण विजयी झाले आहेत. त्यानी भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला. नांदेडचे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपात प्रवेश करुन ते राज्यसभेचे खासदार झाले आहेत. त्यांचं हे मोठं अपयश असल्याचं मानण्यात येत आहे.
  • नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला आहे. या ठिकाणी दोन्ही उमेदवार शिवसेनेचे होते. हेमंत गोडसे यांच्यावर अनेक आरोप झाले होते. त्यांना शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा पराभव झाला.
  • पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा विजयी झाले आहेत. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव केला.
  • पुणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव केला. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून फुटलेल्या वसंत मोरे यांना उमेदवारी दिली होत. त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.
  • शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले आहेत. त्यांनी महायुतीच्या शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला. अजित पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे यांनी बाजी मारली. अत्यंत हुषार आणि संसदेत मतदारसंघाचे प्रश्न मांडणारे खासदार म्हणून अमोल कोल्हे यांचा संसदरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
  • ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा पराभव केला.
  • सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला.
  • शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला.
  • नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा पराभव केला.
  • दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव केला.
  • अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.
  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी झाले आहेत. त्यानी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव केला.
  • मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांचा विजय झाला आहे. त्यानी भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला आहे.
  • कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला.
Last Updated : Jun 5, 2024, 7:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details