मुंबई Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल महाविकास आघाडीकडून वाजवण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आदी प्रमुख नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री कोणाचा होणार? यापेक्षा राज्यावर जे संकट आहे त्याला सामोरं जाण्यासाठी आणि महायुतीचं सरकार उलथवून लावण्यासाठी विधानसभा निवडणुकीला सर्वांनी एकत्र सामोरं जायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आणण्याचा निर्धार यावेळी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात नेत्यांनी केला.
राज्य सरकार घाबरलं :मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, "निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार विविध घोषणांचा पाऊस पाडत आहे. राज्य सरकार घाबरलं आहे. केंद्रातील सरकार तर आधीच घाबरलं आहे. काल राहुल गांधींना विरोधी पक्षनेते म्हणून अपमानजनक सन्मान दिला. हा लोकशाहीवरील आघात आहे. भ्रष्ट सरकारनं काळा पैसा जमवला आहे. राज्यातील सरकारी पैसा हा शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी आम्ही राज्यात परिवर्तन करणार असून आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे."
परिवर्तनासाठी सज्ज राहा : "उद्या आपली दिशा काय राहणार आहे, याबाबत आज महाविकास आघाडीचा मेळावा होत आहे. राज्यात परिवर्तन हवं असेल तर आधी काय केलं पाहिजे हे ठरवणं गरजेचं आहे. आज राज्यकर्त्यांची भूमिका ही हुकूमशाही आहे. चुकीचे सत्ताधारी तिथे बसले आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि राज्यात परिवर्तन होण्यासाठी काम केलं पाहिजे. विधानसभा निवडणूक आम्ही सगळे एक दिलानं लढणार आहोत. एकजुटीनं निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा, मतभेद बाजूला ठेवा आणि राज्यात परिवर्तन करण्यासाठी महायुती सरकार घालवण्यासाठी एकजुटीनं एकत्र या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.