मुंबई MLC Election : दोन दिवसांनी म्हणजेच 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असून यासाठी अपक्ष व छोटे घटक पक्ष यांची मागणी वाढली आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं कोणाचे बारा वाजणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशात महायुतीला आपले 9 उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 6 मतांची गरज पडणार आहे, तर महाविकास आघाडीला आपले 3 उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 4 किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडणार आहे. अशा परिस्थितीमध्ये अपक्ष आणि छोटे घटक पक्ष यांचं महत्त्व फार वाढलं असून त्यांना खुश करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने केले जात आहेत.
विजयासाठी 23 मतांचा कोटा : विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयासाठी आमदारांना 23 मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. विधानसभेच्या एकूण 288 आमदारांपैकी 14 आमदार नसल्यानं 274 आमदार मतदान करणार आहेत. यात महायुतीकडं 201 तर महाविकास आघाडीकडं 65 आमदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये महायुतीला त्यांचे नऊ आमदार निवडून आणण्यासाठी आणखी 6 मतांची तर महाविकास आघाडीला आपले तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 4 किंवा अधिक मतांची गरज पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीमुळं मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अपक्ष किंवा छोटे घटक पक्ष यांच्या आमदारांना आपल्या बाजूनं आणण्यासाठी दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या आमदारांना खुश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या मतदारसंघात विकास कामांना प्राधान्य देऊन त्यासाठी निधीही मंजूर केला जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
छोटे घटक पक्ष आणि त्यांचे आमदार :
- बहुजन विकास आघाडी - 3
- समाजवादी पक्ष - 2
- एमआयएम - 2
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1
- शेतकरी कामगार पक्ष - 1
- एकूण - 9
घटक पक्षांना खुश करण्याचे प्रयत्न : महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये छोट्या घटक पक्षांना नेहमीच अधिक महत्त्व प्राप्त होतं. लोकसभा विधानसभा निवडणुकीत छोट्या घटक पक्षांच्या विरोधात खासदार आमदारांना उतरवणारे सत्ताधारी विधानपरिषदेच्या निवडणुकीत मात्र छोट्या घटक पक्षांसमोर नतमस्तक होताना दिसतात. अशामध्ये बहुजन विकास आघाडी या हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला नेहमीच अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाकडं 3 मतं असून ती अतिशय निर्णायक गेम चेंजर ठरणारी आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचीही भेट घेतली. या कारणानं आता हितेंद्र ठाकूर यांची मतं कोणाच्या बाजूनं झुकणार हे गुलदस्त्यात असलं तरी निवडणुकीच्या 4 दिवसांपूर्वीच वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आचोळे इथं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारनं 250 कोटी मंजूर केले आहेत. तसंच याचा पहिला टप्पा म्हणून 25 कोटी रुपये देण्यातही आले आहेत. आता या कारणानं हितेंद्र ठाकूर यांची मतं महायुतीला जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावर बोलताना समाजवादी पक्षाचे अबू आझमी म्हणाले, "आम्हाला जे मदत करतात आम्ही त्यांच्या बाजूनं असतो. हे गुप्त मतदान असल्यानं आम्ही उघडपणे सांगू शकत नाही. तरीही आमचा पाठिंबा महाविकास आघाडीलाच राहिलेला आहे."
महाविकास आघाडीकडे किती मतं :
राष्ट्रवादी शरद पवार - 12
उद्धव ठाकरे शिवसेना - 16
काँग्रेस - 37
एकूण - 65
महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकणारे पक्ष :
1) समाजवादी 2
2) एमआयएम 2
3) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1
4) शेतकरी कामगार पक्ष 1
- महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे पक्ष लक्षात घेऊन एकूण आमदार - 71