महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत 'एमआयएम' मैदानात, इम्तियाज जलील यांना हवी संधी - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी इम्तियाज जलील मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.

Imtiyaz Jaleel
इम्तियाज जलील (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2024, 8:35 PM IST

Updated : Oct 17, 2024, 9:03 PM IST

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत. सर्वात आधी पक्षाला नांदेडमध्ये यश मिळालं होतं, तिथे आम्हाला नक्कीच संधी असल्यानं, आम्ही निवडणूक लढवणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी सूचना केली तर विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका लढवायला तयार आहे. तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी सक्षम पर्याय द्यावा याकरिता मनोज जरांगे यांची भेट घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

नांदेड लोकसभा निवडणूक एमआयएम लढवणार : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी विजय मिळवला होता. मात्र, आजारानं त्यांचं निधन झाल्यानं पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून दिवंगत वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्याचवेळी आता त्यांच्या विरोधात एमआयएम पक्ष निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयारी करत आहे. "नांदेड जिल्ह्यात आम्हाला सर्वात आधी यश मिळालं होतं, महानगरपालिकेत आम्हाला खूप मोठा विजय मिळाल्यानं तिथे आमची ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळं एक संधी उपलब्ध होत असल्यानं आम्ही ती घेणार आहोत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सर्वांनी मिळून माझा पराभव घडवून आणला," असं इम्तियाज जलील म्हणाले.

प्रतिक्रिया देताना MIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (ETV Bharat Reporter)

पक्षाचे अध्यक्ष घेतील निर्णय : "नांदेड येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना खासदारकी लढण्याबाबत जलील यांना उमेदवारी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र लिहिलं आहे. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडं देण्यात आला आहे, ओवैसी यांनी सांगितलं तर लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक देखील लढवायला तयार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्य आणि पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघात आमची ताकद चांगली आहे. तिथे देखील लढू शकतो, त्याशिवाय ग्रामीण भागातील मतदारसंघात देखील आम्हाला संधी मिळू शकते. त्यामुळं कुठेही निवडणूक लढायला सांगितल्यास मी तयार आहे," असं सांगत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उभा राहणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं.

तुमचे तर्क- वितर्क लावा : "मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतर उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली. राज्यात परिवर्तन करण्यासाठी मी चर्चा करायला गेलो होतो. मागील काही दिवसात सामाजिक तेढ वाढला आहे. तो कमी करण्यासाठी आणि एक चांगला पर्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता त्यावर काय तर्क-वितर्क लावायचे ते तुम्ही तुमचं ठरवा. मात्र, मागील काही वर्षात जरांगे पाटील यांना अनेकदा भेटलो आहे. निवडणूक आली म्हणून त्यांना भेटलेलो नाही," असं देखील इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा -

  1. "वेळेनुसार पत्ते उघडावे लागतात...", निवडणूक जाहीर होताच इम्तियाज जलील मनोज जरांगेंच्या भेटीला
  2. ...तर दहा मिनिटं नवनीत राणा एकटी नाचेल; इम्तियाज जलील यांची जहरी टीका - lok sabha election
  3. नितेश राणे फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू...'या' नेत्याने केला हल्लाबोल - Imtiyaz Jaleel
Last Updated : Oct 17, 2024, 9:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details