मुंबई Maratha VS OBC Reservation : राज्यामध्ये मराठा आरक्षणातील सगेसोयरे या शब्दाला असलेला आक्षेप, याबद्दल आठ लाखांहून जास्त आलेल्या हरकती, जास्तीत जास्त हरकती घेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेलं आवाहन, या पार्श्वभूमीवर आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय. त्यातच लक्ष्मण हाके या ओबीसी नेत्यांनी सुद्धा उपोषण आणि आंदोलनाची भूमिका घेतल्यानं आता, एकीकडं मराठा आंदोलन आणि दुसरीकडं ओबीसी आंदोलन असं चित्र तयार झाले आहे. यामुळं दोन्ही समाजाचे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरण करण्याचा हा अंतस्थ प्रयत्न असल्याची चर्चाही सुरू आहे.
ध्रुवीकरणाची सुरुवात :ऑगस्ट 2023 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आंदोलनाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसाद आणि त्यानंतर राज्य सरकारनं त्यांच्याशी चर्चा करून घेतलेले निर्णय यामुळं राज्य सरकार मराठा समाजापुढे झुकल्याचं ओबीसी नेत्यांनी म्हटलं होतं. आता पंकजा मुंडे यांच्या विधान परिषदेतील विजयानंतर ओबीसी समाजाने एकत्र येऊन केलेला विजयाचा जल्लोष हा या ध्रुवीकरणाची सुरुवात असल्याचं म्हटलं जातय.
जरांगे पाटील यांचा पुन्हा इशारा: राज्य सरकारनं जर मराठा समाजाबद्दल योग्य निर्णय घेतला नाही तर आपण मराठा समाजातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करू असा इशारा, जरांगे पाटील यांनी दिलाय. त्यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 20 तारखेपासून उपोषणाचा इशारा दिलाय. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत चांगल्याच फटका सहन करावा लागला. एकीकडं जरांगे पाटील हे महायुतीमधील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर सातत्यानं टीका करत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावर मात्र, त्यांनी फारशी टीका केली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाबद्दल त्यांची असलेली मवाळ भूमिका पाहता महायुती मधील पक्षांमध्येच आता या प्रश्नावरून मतभेद निर्माण होत आहेत.