हैदराबाद Type1 And Type 2 Diabetes: मधुमेह हा सामान्य आजार झाला आहे. प्रत्येकाच्या घरात कुणी न कुणी मधुमेहानं ग्रस्त आहे. मधुमेह ग्रस्तांना सतत औषधं आणि अनेक पथ्य पाडावी लागतात. रक्तातील ग्लुकोज किंवा रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचं नियमन होत नाही तेव्हा मधुमेह होतो. ग्लुकोज हा शरीराचा ऊर्जेचा स्रोत आहे. लुकोज आपण खात असलेल्या अन्नातून उत्पन्न होतं. इन्सुलिन, स्वादुपिंडात बनवलेले हार्मोन, ग्लुकोज पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करतं. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं या स्थितीला 'मधुमेह' म्हणतात. मधुमेहाचे दोन मुख्य प्रकार आहेत. टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या (NIDDK) अहवालानुसार, संशोधकांना असं आढळून आलं की मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत. अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठातील डॉ. डॅनियल बेसन यांनी संशोधनात हे सिद्ध केलं आहे. मधुमेहामुळे डोळे, मूत्रपिंड, नसा आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. काही प्रकारामध्ये कर्करोगाचा धोका असल्याचही त्यांनी सांगितलं.
मधुमेहाचे प्रकार
टाइप 1 मधुमेह : टाइप 1 मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन कमी तयार होतात किंवा होत नाही. यामध्ये स्वादुपिंडातील पेशी नष्ट होतात. टाइप 1 मधुमेह सहसा लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये होतो. परंतु, काही लोकांमध्ये कोणत्याही वयात दिसून येतं. मधुमेह काही प्रमाणात अनुवंशिक आहे. तज्ज्ञांच्या मते, टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांना निरोगी राहण्यासाठी दररोज इन्सुलिन घेणं आवश्यक आहे.
टाइप 2 मधुमेह: शरीराच्या पेशी इंसुलिनचा योग्य वापर करू शकत नाहीत तेव्हा टाइप 2 मधुमेह होतो. स्वादुपिंड इन्सुलिन बनवू शकतो, परंतु आपल्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य श्रेणीत ठेवण्यासाठी पुरेसे इंसुलिन तयार करत नाही. टाइप 2 प्रकारचा मधुमेह जास्त वजन, लठ्ठपणा आणि आनुवंशिकतेमुळे होतो. हा मधुमेहाचा सर्वात सामान्य प्रकार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच गरोदरपणातील मधुमेह, प्री-डायबिटीस, मोनोजेनिक मधुमेह असे अनेक प्रकार आहेत.
दुर्लक्ष केलं तर.. : मधुमेहामुळे अनेकांना धोकादायक आजारांनी घेरले आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. किडन्या खराब होतात. शिवाय दृष्टी कमजोर होण्याची शक्यता असते. म्हणूनच शुगरच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहावं आणि न चुकता उपचार करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
अशा प्रकारे करा साखर नियंत्रण : मधुमेह असलेल्यांसाठी शरीरातील साखर नियंत्रण करणं आवश्यक आहे. यासाठी सकस आहार घेतला पाहिजे. कॅलरी कमी, साखर कमी आणि फायबर जास्त असलेले पदार्थ खावं. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घ्यावीत. जास्त वजन असल्यास ते कमी केले पाहिजे.
अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.niddk.nih.gov/health-information/diabetes/overview/what-is-diabetes
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)