बीड Beed Rape Case : शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीवर बलात्कार (Rape Case) करून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, पुन्हा वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
काय आहे घटना : जानेवारी 2024 मध्ये केज येथील एक तरुणी लातूरला जाण्यासाठी बसची वाट पाहात थांबली असता, तिच्या ओळखीचा आणि सोशल मीडियावर ओळख झालेला सूरज गुंड नावाचा एक तरुण तेथे आला. तो तिला म्हणाला की, तो देखील लातूरला जात आहे. असं म्हणून त्यानं तरुणीला त्याच्या चारचाकी कारमध्ये बसवलं. केजपासून पुढे 70 किमी अंतरावर असलेल्या रेणापूर येथील एका हॉटेलवर त्यानं गाडी थांबवली. त्यानं तिला जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीनं हॉटेलच्या एका रुममध्ये तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. तसंच त्याच्या मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : तिने जर हा घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर तो सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी तरुणीला दिली. त्यानंतर तिला वारंवार ब्लॅकमेल करत तिच्यावर 10 ते 12 वेळा लैंगिक अत्याचार केला. भीतीपोटी आणि कुटुंबाच्या इज्जतीपोटी पीडित तरुणी हे सर्व सहन करत होती. त्यानंतर एके दिवशी सूरज गुंडने ते सर्व व्हिडिओ आणि फोटो हे तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर पाठवले. आई-वडिलांनी त्या तरुणीला याचा जाब विचारला असता तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी 11 सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात याबाबत पीडित तरुणीची तक्रार नोंदवण्यात आली. केज पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे सूरज गुंड याच्यावर पाळत ठेवून त्याच्या मुसक्या आवळल्या. आज त्याला केज सत्र न्यायालयात हजर केलं असता, कोर्टानं चार दिवसांची १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल : तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या सूरज गुंड याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. 485/2024 भा. न्या. सं. 2023 अधिनियम कलम 65(1), 64(2)(M), 333(B), 115(2), 352, 351(1), 351(2) यासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(2) (5), 3(2)(VA), (1)(R), 3(1)(S) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे 66, 66(E) नुसार बलात्कार, ॲट्रॉसिटी आणि आयटी ॲक्ट नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्स्टाग्रामवरची मैत्री महागात पडली : पीडित तरुणीने सूरज गुंडची इन्स्टाग्रामवरची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारली होती. त्यानंतर ते एकमेकांशी बोलत होते. त्याचा गैरफायदा घेत तो एके दिवशी तिच्या होस्टेलवर गेला. नंतर ते दोघे मोटार सायकलवर शहरात फिरले.
लॉजचाही काळा धंदा : ज्या लॉजमध्ये तरुणीवर अत्याचार झाला. त्या लॉजमध्ये त्यांचे ओळखपत्र न पाहता त्यांना रूम कशी काय दिली? याचाही पोलीस तपास करत आहेत.
बळजबरीने लग्न केल्याची काढली सेल्फी : जून 2024 मध्ये तरुणी ही घरी एकटी असताना सूरज गुंड हा तिच्या घरात घुसला. त्यानं जबरदस्तीनं तिच्या डोक्यावर सिंदूर लावून त्याचा सेल्फी काढला आणि 'तू माझी बायको झालीस' असं म्हणून पुन्हा तिच्यासोबत बळजबरीनं लैंगिक संबंध ठेवले.
पीडित तरुणीचे आई-वडील हे प्रचंड तणावाखाली असून त्यांनी सूरज गुंडच्या भीतीपोटी त्यांचं घर विकून गाव सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. जर असे छेडछाड किंवा अत्याचाराचे प्रकार होत असतील तर निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच कुणाला अशा प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणारांचं नाव गुप्त ठेवून कठोर कारवाई केली जाईल. - प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक, केज पोलीस ठाणे
सखी केंद्राची भूमिका संशयांच्या भोवऱ्यात : सततच्या वारंवार होणाऱ्या अत्याचार आणि त्रासाला कंटाळून तरुणीनं 20 जुलै रोजी सूरज गुंड हा तिला त्रास देत असल्याची माहिती बीड येथील सखी केंद्रात दिली होती. त्यानंतर 29 जून रोजी सूरज गुंडला सखी केंद्रात बोलावून त्याच्याकडून तो त्या तरुणीला पुन्हा त्रास देणार नाही, असं पत्र लिहून घेतलं होतं. मात्र एवढा गंभीर आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार असतानाही पोलिसांना याची माहिती न देता केवळ लेखी पत्र घेऊन प्रकरण दडपण्याचा तर प्रकार नव्हता का? यामुळं सखी केंद्राच्या आणि तेथील अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.
हेही वाचा -