कोल्हापूर Shahu mandal story : सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कृतिशील विचारांचा वारसा असलेल्या कोल्हापूर शहरात शाहू महाराजांचा विचार आजही जपला जातो. शहरातील जुना वाशी नाका परिसरात असलेल्या श्री शाहू सैनिक तरुण मंडळानं गेली पाच दशकं शिकलगार कुटुंबात अध्यक्ष पदाचा मान देऊन सामाजिक सलोख्याचं मूर्तिमंत उदाहरण संपूर्ण राज्याला घालून दिलं आहे. एकीकडे मंडळाच्या अध्यक्ष पदासाठी हिंसा घडल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत, मात्र कोल्हापुरातील या मंडळानं हिंदू-मुस्लिम ऐक्य जपत सार्वजनिक गणेश मंडळांचा उद्देश आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे.
शाहू सैनिक तरुण मंडळाची स्थापना :1 सप्टेंबर 1969 या दिवशी कोल्हापुरातील जुना वाशी नाका येथे हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी एकत्र येत श्री शाहू सैनिक तरुण मंडळाची स्थापना केली होती. मंडळाच्या स्थापनेत हिरीरीने सहभागी झालेल्या चांदसाहेब शिकलगार यांनी आपल्या अंगणातील जागा मंडळासाठी मोकळी करून दिली. तेव्हापासून आतापर्यंत शिकलगार यांच्या कुटुंबातील सदस्याला मंडळानं अध्यक्षपदाचा मान दिला आहे. हिंदू आणि मुस्लिम कुटुंबातील सुमारे 200 सभासदांचं मंडळ असलेल्या श्री शाहू सैनिक तरुण मंडळानं राजर्षी शाहूंच्या सामाजिक सलोख्याचा संदेश यानिमित्तानं जपला आहे. शिकलगार कुटुंबातील चौथी पिढी आता अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. चांदसाहेब शिकलगार यांच्यानंतर बादशहा, मेहबूब, सिकंदर आणि आता इब्राहिम शिकलगार मंडळाचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी दाखवलेल्या वाटेवरूनच यापुढेही चालणार असल्याचा संकल्प यानिमित्ताने अध्यक्ष इब्राहीम शिकलगार यांनी केलाय.
डोक्यावरून दगडं आणून मंडळाचं बांधकाम : मंडळाची स्थापना झाल्यानंतर मंडळाला इमारत नव्हती. यावेळी जुन्या प्रमुख कार्यकर्त्यांनी खाणीतून मोठ-मोठे दगड डोक्यावरून वाहत आणून इमारत उभी केली अशी आठवण जुने कार्यकर्ते अशोक सूर्यवंशी यांनी सांगितली. चांद आबाभाई शिकलगार, दगडोबा चव्हाण, आनंदराव चव्हाण, लहू लक्षण कवडे, आनंदराव सुतार, वसंत आगळे, आनंदराव चौगले, दोलू पाटील, पांडुरंग सावंत, दादू जरग, अजीज मोमीन, निंबाळकर सर, दादू मोरे, मोहन वेस्नेकर, किसन संकपाळ, शंकर कलकुटगी, मोहन माने, शिवाजी पाटील अशी या प्रमुख कार्यकर्त्यांची नावं आहेत.
नैवेद्य आणि आतषबाजी शिकलगार कुटुंबाकडून : अकरा दिवसांसाठी विराजमान होणाऱ्या लाडक्या गणरायाला रोजचा नैवेद्य अर्पण करण्याचा मानही त्या कुटुंबालाच दिला जातो. जातीपातीच्या भिंती आड न येता, हिंदू मुस्लिम सलोख्याचे उदाहरण कोल्हापुरात या मंडळानं सिद्ध केलं आहे. दरवर्षी गणपती उत्सवाच्या काळात शिकलगार कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या आतषबाजी करून आनंद साजरा केला जातो.
हेही वाचा..