मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं बघायला मिळतंय. त्यात महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसनं भाजपाचा विरोध असतानाही नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्यानं महायुतीत धुसफूस सुरू आहे. याविषयी बोलताना नवाब मलिक यांनी "आपली उमेदवारी महाविकास आघाडी तसंच महायुतीच्या विरोधात आहे", असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, मलिक यांच्या या वक्तव्यावरुन आता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार अबू आझमींनी यांनी शायरीतून टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले अबू आझमी? :यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधत असताना अबू आझमी म्हणाले की, "महायुतीसोबत राहून कसली धर्मनिरपेक्षता आणि कसलं काय? 'ख़ूब पर्दा है कि चिलमन से लगे बैठे हैं, साफ़ छुपते भी नहीं, सामने आते भी नहीं.' भाजपा आणि शिवसेनेसोबत महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवत असलेले उमेदवार धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करत आहेत.", असं आझमी म्हणाले.
अबू आझमी यांची मुलाखत (ETV Bharat Reporter) भाजपावर टीका :"या मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाची मतं विभाजित करण्यासाठी भाजपानं जाणीवपूर्वक आपल्याविरोधात उमेदवार दिलाय", असा आरोप अबू आझमी यांनी केला. "विरोधक या मतदारसंघात अमली पदार्थांच्या खरेदी विक्री होत असल्याचं सांगून टीका करून मतदारसंघातील नागरिकांचा अपमान करत आहेत. त्यांनी अगोदर त्यांच्या पूर्वीच्या मतदारसंघातील परिस्थितीबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अमली पदार्थांची समस्या राज्याच्या अनेक भागात आहे. त्यामुळं केवळ मानखुर्द शिवाजीनगरलाच लक्ष्य करणं चुकीचं आहे," असे मत त्यांनी व्यक्त केलंय.
- ही लढाई दोन गटांत : "ही लढाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मानणारा वर्ग आणि संविधानाला संपवू पाहणाऱ्यांमधील असल्याचं आझमी म्हणाले. एनआरसी, लव्ह जिहाद, व्होट जिहाद आदी विषयांवर राजकारण करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले, इथं येऊन अल्पसंख्याक मते विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत," असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा -
- भाजपाचा तीव्र विरोध डावलून नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवारी
- "महाविकास आघाडीसह महायुती विरोधात...", नेमकं काय म्हणाले नवाब मलिक? वाचा सविस्तर
- "ते माझ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, मी प्रचाराला जाणार," नवाब मलिकांबाबत अजित पवारांची भूमिका स्पष्ट